सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया(Celebrity MasterChef India) हा रिअॅलिटी शो काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत होता. या शोमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी(Nikki Tamboli), अर्चना गौतम, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख, अभिजीत सावंत, दीपिका कक्कर हे कलाकार या स्पर्धेत सहभागी झाले होते. आता या शोचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफचा विजेता कोण ठरला ते जाणून घेऊ…
सेलिब्रिटी मास्टरशेफच्या उपांत्य फेरीत निक्की तांबोळी, अर्चना गौतम, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख हे सहा स्पर्धक पोहोचले होते. अंतिम फेरीत निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश व गौरव खन्ना हे तीन स्पर्धक पोहोचले होते. गौरव खन्नाने निक्की तांबोळी व तेजस्वी प्रकाशला मागे टाकत विजेतेपदावर नाव कोरले आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडियाच्या पहिल्या सीझनचा विजेता ‘अनुपमा’ फेम गौरव खन्ना ठरला. गौरव खन्नाने या प्रवासात अनेक विविध पदार्थ बनवत अनेकदा परीक्षकांना आश्चर्यचकित केले होते. त्याने आत्मविश्वासाने प्रत्येक फेरीत यश मिळवले असल्याचे दिसले. इतकेच नाही, तर त्याने त्याच्या वागण्यानेदेखील सर्वांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले. जिंकल्यानंतर गौरव खन्नाला २० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
अंतिम फेरीत निक्की तांबोळीला दुसऱ्या, तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. निक्की तांबोळी याआधी बिग बॉस १४, बिग बॉस मराठी ५, खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. विशेष बाब म्हणजे निक्की तांबोळी सलग तिसऱ्या रिअॅलिटी शोमध्ये टॉप ३ मध्ये होती; मात्र ती विजेतेपद मिळवू शकली नाही. बिग बॉस १४ मध्ये ती तिसऱ्या स्थानावर होती. बिग बॉस मराठी ५ मध्येदेखील तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि आता सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडियामध्ये तिने दुसरे स्थान पटकावले. निक्की तांबोळी लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. या स्पर्धेत ती काय कमाल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गौरव खन्नाबद्दल बोलायचे, तर अभिनेत्याने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, ‘अनुपमा’ या मालिकेतून त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’नंतर तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.