Aarya slapped Nikki in Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात भांडण झालं. ‘जादुई हिरा’ या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्कीदरम्यान वाद झाला आणि नंतर आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. मराठी कलाकारही त्यांची मतं मांडत आहेत, अशातच निक्कीच्या आईने या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
निक्की तांबोळीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या आईच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात तिची आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या, “नमस्कार, मी प्रमिला तांबोळी. निक्की तांबोळीची आई. काल बिग बॉसच्या घरामध्ये जी घटना घडली, निक्कीवर आर्याने हल्ला केला, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे बिग बॉसने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. आम्ही इथे राहून काही करू शकत नाही, पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटते. बिग बॉसच्या घरात सारखं सारखं तिच्याबरोबर असं घडतंय.”
संग्रामवर निक्कीच्या आईने केली टीका
पुढे त्या म्हणाल्या, “मागच्या आठवड्यात तो संग्राम आला, त्याने मोठ्यामोठ्या गोष्टी केल्या आणि निक्कीला वॉर्न न करता मी तुला ढकलतो म्हणत अचानक तिला पाण्यात धक्का दिला. हे सगळं काय आहे? हे असं व्हायला नको ना. तिला काही त्रास झाला असेल, अचानक धक्का मारल्यावर नाका-तोंडात पाणी जातं. ठिक आहे, तिला काही झालं नाही ही चांगली गोष्ट आहे. संग्रामने जे केलं तेही योग्य नव्हतं.”
प्रमिला तांबोळी अरबाज पटेलबद्दल म्हणाल्या…
अरबाजबद्दल त्या म्हणाल्या, “तुम्ही सगळे बाओ करता की अरबाज असा करतो, तसा करतो.. काय केलंय अरबाजने? अरबाज कितीही आक्रमकपणा करत असेल तरीही त्याच्या आक्रमकपणामुळे कुणालाही इजा झालेली नाही, कुणाला दुखापत झालेली नाही. पण निक्की त्रास झाला आहे, मागे आर्या निक्कीच्या हाताला चावली, तिच्या पोटाला चावली, तिच्या हाताला तिने एवढं घट्ट आवळून धरलं की तिचा हात किती तरी दिवस काळा पडला होता. त्याची पण बिग बॉसने दखल घेतल्याचं दिसलं नाही. कारण शनिवार-रविवारच्या एपिसोडमध्येही ते दाखवलं नाही. हे असं कसं? छोट्या-छोट्या गोष्टीसाठी उकरून काढतात आणि दाखवतात. पण निक्कीबद्दल घरामध्ये सारखं सारखं असं होतंय.”
पुढे त्या म्हणाल्या, “आता आर्याने जे काल केलं.. टास्क खेळण्याऐवजी तिचं लक्ष फक्त निक्कीला कसा कसा त्रास द्यायचा, निक्कीला कसं अडवायचं, निक्कीला कसं खेळू नाही द्यायचं, हेच अंकिता, आर्या, वर्षाताई यांनी ठरवलं होतं. बिग बॉसनेही असे ग्रुप बनवलेत की एका ग्रुपमध्ये सर्वजणी आणि एका ग्रुपमध्ये त्यांनी अटॅक करावं यासाठी फक्त निक्कीला ठेवलंय. बाकीचे तर काही खेळतच नव्हते. निक्कीला जर खेळूच द्यायचं नाही असंच तुमचं ठरलं होतं तर मग बिग बॉसने निक्कीला सांगायचंच नव्हतं की निक्की तू खेळू शकतेस. आर्याने जेव्हा दोन-तीन वेळा दार लावून घेतलं, तेव्हा बिग बॉसने एकदाही म्हटलं नाही की आर्या हे खेळाच्या नियमामध्ये नाही. तू दार लावू शकत नाही. पण बिग बॉस तसं काहीच बोलले नाहीत आणि त्याचाच परिणाम असा झाला की पुढे आर्याने तिला मारलं. तिने शारीरिक हिंसा केली.”
आर्याला घराबाहेर काढण्याची केली मागणी
निक्कीच्या आईने आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. “प्लीज बिग बॉस, या प्रकरणाची काहीतरी गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही. आमची मुलगी मुलगी बिग बॉसच्या घरात काय मार खायला गेली आहे का? हे चुकीचं आहे. प्लीज बिग बॉस काहीतरी करा. हात जोडून विनंती आहे. माझ्या मुलीला संरक्षण मिळालं पाहिजे, तरच आम्ही निश्चिंतपणे हा शो बघू शकू. आमचा विचार करा ना. आम्हाला कसं वाटत असेल ते, प्लीज काहीतरी करा. आर्या नकोय आता घरात. काढा तिला बाहेर,” असं त्या म्हणाल्या.