निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) बिग बॉस मराठी ५ च्या घरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या वागण्या-बोलण्यावर अनेकदा प्रेक्षकांकडून टीकादेखील झाली. तिच्या खेळासाठी तिचे कौतुकदेखील करण्यात आले. पहिल्याच आठवड्यात जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण आणि अरबाज पटेलबरोबर निक्की तांबोळीने ग्रुप बनवला होता. मात्र, तिच्याविषयी ग्रुपमधील स्पर्धकांनी तिच्यापाठीमागे बोललेल्या गोष्टी जेव्हा दाखवण्यात आल्या, त्यावेळी या ग्रुपमध्ये फूट पडली.

काय म्हणाली निक्की तांबोळी?

या सगळ्यांबरोबर निक्की तांबोळी वारंवार ‘बाई’ असे म्हणण्यामुळे चर्चेत राहिली. तिचा बाई हा शब्द इतका प्रसिद्ध झाला की, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावर रीलदेखील बनवल्याचे पाहायला मिळाले. आता ती वारंवार या शब्दाचा का वापर करते, तिला हा शब्द कुठून मिळाला, याबद्दल निक्कीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

निक्की तांबोळीने नुकतीच ‘सकाळ प्रीमिअर’ला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारण्यात आले की, बाई हा शब्द तू बिग बॉस मराठीमध्ये येण्याआधीपासून वापरत होतीस की या शोमध्ये आल्यानंतर तुला हा शब्द मिळाला? यावर बोलताना निक्कीने म्हटले, “माझी एक पुण्याची मैत्रीण आहे, तिचं नाव स्नेहा आहे. ती बोलताना बाई हा शब्द खूप वापरायची. तिच्याकडून मी तो शब्द घेतला आहे. आता तो शब्द इतक्या मोठ्या प्रमाणात वापरते की, माझे सगळे मित्र-मैत्रिणी जे मराठी, हिंदी, पंजाबी आहेत त्यांचा मला फोन आला की बाई या शब्दापासून संवाद सुरू होतो. ते मला फोन करून विचारतात, बाई कुठे आहेस तू? बाई कुठे चालली आहेस तू? बाई जेवली का? माझ्या आयुष्यात सगळं बाई या शब्दापासूनच सुरू होतं.”

हेही वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आनंद शिंदेंबरोबर झाली अचानक भेट, फोटो शेअर करत म्हणाला, “माझं बालपण…”

दरम्यान, निक्की तांबोळी या सगळ्याबरोबरच तिच्या भांडणामुळे, टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळे आणि अरबाज पटेलबरोबरच्या मैत्रीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली. निक्कीला तिसऱ्या स्थानावरून बिग बॉसच्या घराबाहेर पडावे लागले. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला तर अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. आता बिग बॉसनंतर निक्की तांबोळी कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.