Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वापासून निक्की तांबोळी घराघरांत लोकप्रिय झाली. तिने हा शो जिंकला नसला तरीही, संपूर्ण महाराष्ट्रात निक्कीची चर्चा होती. तिने ‘बिग बॉस’च्या घरात अन्य स्पर्धकांशी घातलेले वाद, अरबाजबरोबर तिचं बॉण्डिंग या गोष्टी सर्वत्र चर्चेत आल्या होत्या. आजवर निक्कीने अनेक रिअॅलिटी शोज मध्ये सहभाग घेतलाय. ‘बिग बॉस हिंदी’, ‘द खतरा-खतरा’ हे दोन्ही शो सुद्धा निक्कीने गाजवले. सध्या ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सहभागी झाली आहे. यानिमित्ताने निक्कीने नुकतीच तिच्या आयुष्यातील एक खंत चाहत्यांसमोर बोलून दाखवली आहे.
निक्की म्हणते, “जेव्हा एखाद्या शोमध्ये मी एन्ट्री घेते, तेव्हा त्या शोची चर्चा माझ्यामुळेच सुरू होते. माझा आतापर्यंतचा प्रवास खूपच उत्तम झालाय. मी स्वत:ची एक वेगळी ओळख या इंडस्ट्रीत निर्माण केलीये. पण, या क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हा या प्रवासात माझ्या जवळचे लोक माझ्यापासून दुरावले…खासकरून माझे बाबा.”
निक्की पुढे म्हणाली, “या इंडस्ट्रीत यायला माझ्या बाबांचा विरोध होता. पण, निक्की ही निक्की आहे ती कधीच कोणाचं ऐकत नाही. तसंच मी तेव्हा त्यांचं ऐकलं नाही. माझे वडील कायमच माझ्यासाठी एका सुपरहिरो राहिले आहेत. पण, जेव्हा हे सुपरहिरो तुमच्या आयुष्यातून दूर जातात तेव्हा एका उडणाऱ्या पाखराचे पंख छाटल्याची भावना मनात येते…आणि याचं मला सर्वात जास्त दु:ख होतं. वडिलांकडून कौतुकाची थाप मिळावी अशी माझी कायम इच्छा असते. माझे बाबा मला बोलावेत की, तू जे काही करते आहेस, ते उत्तम आहे. मला तुझा अभिमान वाटतो. त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहतेय”
“सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये मी जे जेवण बनवतेय, आणि यापुढेही मी जे नवनवीन पदार्थ बनवेन हे सगळे प्रयत्न माझ्या कुटुंबीयांसाठी आहेत. माझ्या वडिलांचं आणि माझं नातं पूर्वीसारखं झालं पाहिजे. कारण, ते मला टिव्हीवर पाहतील तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे माझी निकिता आता परत आलीये. ही तिच निकिता आहे जिला मी लहानपणी जेवण बनवायला शिकवलं, ही भावना माझ्या बाबांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. मी या शोमध्ये याचसाठी आलीये जेणेकरून आमचं नातं आधीसारखं होईल.” अशी इच्छा निक्कीने यावेळी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ हा शो सोमवार ते शुक्रवारी रात्री ८ वाजता सोनी टिव्हीवर प्रसारित केला जातो. निक्कीने शेअर केलेल्या या पोस्टवर अरबाजने देखील कमेंट करत “तुझ्या सगळ्या इच्छा लवकर पूर्ण होवोत” असं म्हटलं आहे.