‘बिग बॉस मराठी ५’नंतर प्रसिद्धीझोतात आलेली निक्की तांबोळी (Nikki Tamboli) कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत राहत असते. ‘बिग बॉस’च्या घरातही तिनं अपला दबदबा कायम ठेवला होता. ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली निक्की उपविजेती ठरली होती. ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो संपताच तिनं हिंदी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ (Celebrity Masterchef) मध्ये सहभाग घेतला. या शोमध्ये निक्की तिच्या स्वयंपाकाच्या कौशल्यानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करीत आहे.

अशातच तिनं हा शो सोडल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत आणि या चर्चेचं कारण म्हणजे शोचा नवीन प्रोमो. गौरव खन्नाबरोबर झालेल्या भांडणानंतर निक्की शोच्या सेटवरून बाहेर पडली. या प्रोमोमध्ये निक्की गौरववर रागावल्याचे दिसत आहे आणि ती त्याला माफी मागण्यास सांगत आहे. “हा अपमान आहे, मी जात आहे. तुम्हाला जे करायचं आहे, ते करा. तो सॉरी म्हणेपर्यंत मी येणार नाही”, असं ठणकावत ती बाहेर जाताना दिसत आहे.

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये निक्की आणि गौरव या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. शोमधील एका टास्कमुळे त्यांच्यात ही वादाची ठिणगी पडली आहे. यावेळी निक्की ‘गौरवनं माझा वेळ वाया जावा म्हणून हे सगळं केलं’ असल्याचं म्हणत आहे. तसेच ‘गौरवनं हे स्वीकारण्याची वेळ आली आहे की, त्याला असुरक्षितता वाटत आहे’, असंही म्हटलं आहे.

शोच्या आधीच्या भागांमध्ये निक्की गौरवला असं म्हणाली, “मला वाटतं की, हे फक्त इम्युनिटीबद्दल नाहीये. तर, गौरवनं हे स्वीकारण्याची वेळ आली आहे की, तो एक असुरक्षित मुलगा आहे; पुरुषही नाही, तर मुलगाच आहे”. त्यावर गौरव हसला आणि म्हणाला, “पुरुष नाही म्हणजे… हिने ते तपासले आहे का?” नंतर निक्की त्याला उत्तर देत म्हणाली, “मला वाटत नाही की, कोणाकडेही तुला हे तोंडावर सांगण्याची हिंमत आहे”.

हा प्रोमो येताच अनेकांना वाटलं की, तिने हा शो सोडला आहे. मात्र तिने हा शो सोडलेला नाही. ती पुन्हा परतली असून तिने पुन्हा टास्कमध्ये सहभागी होत नवीन पदार्थ केला आहे, ज्याचे कौतुक करत परीक्षकांनी तिच्याविषयी असं म्हटलं की, “निक्की जेव्हा रागात असते आणि ती एखादा पदार्थ बनवते तेव्हा ती खूप लक्ष देऊन ते करते”. तसंच या प्रोमोमध्ये ती आजचा माझा पदार्थ सर्वात उत्कृष्ट तरी असेल नाही तर सर्वात खराब तरी…” असं म्हणते.

दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी गौरवचं समर्थन करताना दिसत आहेत. “गौरव, तू चांगलं केलंस”, “आदरासाठी बोलणं खूप महत्त्वाचं आहे”, “चूक निक्कीची आहे आणि तिला सॉरीही ऐकायचं आहे”, “निकीला महत्त्व देण्याची गरज नाही. हा एक कुकिंग शो आहे; बिग बॉस नाही” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या प्रोमोवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.