डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे तीन विनोदाचे हुकमी एक्के लवकरच प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी येत आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून हे तीन विनोदवीर भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी या नव्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. यावेळेस २० एप्रिलपासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता प्रक्षेपणाची तारीख बदलण्यात आली आहे.
‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचे नवे प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. ज्याद्वारे कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा नवा कार्यक्रम कधीपासून सुरू होणार आहे? जाणून घ्या…
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहेत. या कार्यक्रमात भाऊ कदम व ओंकार भोजने व्यतिरिक्त सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण असे अनेक कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल-आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील हा विनोदाचा अॅटमबॉम्ब आता २० एप्रिलऐवजी २७ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर अजय देवगणचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा आहे फोटो, पाहा व्हिडीओ
दरम्यान, ‘कलर्स मराठी’वर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ व्यतिरिक्त ‘सुख कळले’ ही नवी मालिका देखील सुरू होणार आहे. २२ एप्रिलपासून ही नवी मालिका रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.