‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आता विनोदाचा ॲटमबॉम्ब फोडायला सज्ज झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचलेले महाराष्ट्राचे लाडके डॉ. निलेश साबळे यांच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता ‘कलर्स मराठी’ घेऊन येते आहे. निलेश साबळेंबरोबर भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या कार्यक्रमात सहभागी असणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ असं या नव्या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहेत. यामध्ये भाऊ कदम, ओंकार भोजनेसह सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकार पाहायला मिळणार आहेत. पण या कार्यक्रमाचं नेमकं स्वरुप कसं असणार आहे? याविषयी निलेश साबळे यांनी सांगितलं.

हेही वाचा – इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधताना निलेश साबळे म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा साचा लोकांना माहित झाला आहे. त्यामुळे ‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ या नव्या शोचं स्वरुप बदलणार असून पूर्णपणे वेगळं असणार आहे. हा नवा कार्यक्रम आणखी उंचावर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल. यावेळी कलाकारांची टीम नवीन आहे. त्यातील प्रत्येकाचा चाहतावर्ग मोठा आहे. प्रत्येकाचं विनोदाचं टाइमिंग भन्नाट आहे. शोमध्ये असणारी पात्रं नवीन असतील. त्यामुळे प्रेक्षकांना नवा कार्यक्रम बघताना मजा येईल यावर माझा विश्वास आहे.”

पुढे निलेश साबळे म्हणाले, “हसताय ना? हसायलाच पाहिजे! या कार्यक्रमात कलाकृतीचं प्रमोशन केलं जाणार आहे. पण याचा साचा काहीसा वेगळा असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे सेलिब्रिटी पाहुणे सुद्धा प्रहसन आणि तत्सम वेगवेगळ्या सेगमेंटचा भाग असणार आहेत. मनोरंजनासह प्रबोधन करण्याचं कामही केलं जाणार आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील काही प्रश्नांभोवती दोन सेगमेंट असतील. त्यातील प्रहसनांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं जाईल. त्यामध्ये प्रेक्षकांना त्यांना रोजच्या जीवनात भेडसावणारी एखादी समस्या दिसू शकते. या सगळ्यात वाहिनीचे प्रोगामिंग हेड केदार शिंदे यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे.”

हेही वाचा – “अंडी-ब्रेड खाऊन काढले दिवस…”, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ५ हजार रुपये घेऊन आली होती मुंबईत, सांगितला ‘तो’ संघर्षाचा काळ

दरम्यान, निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे तीन विनोदाचे हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात , नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम २० एप्रिलपासून सुरू होणार आहे. शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh sabale talk about format of hastay na hasaylach pahije new program pps