‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांना १० वर्ष खळखळून हसवलं. एकापेक्षा एक असे विनोदबहाद्दर कलाकार या कार्यक्रमाला लाभले होते. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे असे तगडे हास्यसम्राट प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे. परंतु, गेल्याच महिन्यात या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा अचानक निरोप घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहा वर्षांच्या प्रवासात या कार्यक्रमाचा एक वेगळा असा चाहता वर्ग तयार झाला होता. कार्यक्रम अचानक बंद झाल्याने प्रेक्षक भांबावून गेले होते. या शोमधील काही कलाकारांनी आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात केली, तर काही कलाकार पुन्हा एकदा त्याच उत्साहाने प्रेक्षकांना हसवायला हजर झाले आहेत. कलर्स मराठी वाहिनीवर निलेश साबळेसह अनेक कलाकार ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कॉमेडी शो घेऊन हजर झाले आहेत. या शोच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळेने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

हेही वाचा… “यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टच म्हणाला…

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळे म्हणाला, “प्रेक्षकांना या टीमची सवय आहे, या कॉमेडीची सवय आहे, त्यामुळे लोकांना तो आपलेपणा हवाच आहे. फक्त प्रेक्षक शोधत होते की कुठे गेलात? गायब झालात की काय? कारण त्यावेळेस काही वेळेला आम्ही दिसत नव्हतो. प्रेक्षकांची आवडती चव घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

“मला एकाने प्रश्न विचारला होता, एका ठिकाणी आता तुम्ही नाही आहात आणि दुसर्‍या ठिकाणी जाताय तर तुम्हाला भीती नाही का वाटत? मी म्हटलं बघ, हॉटेल एका ठिकाणी बंद होतं आणि दुसर्‍या ठिकाणी सुरू होतं, तर टेन्शन कोणाला यायला पाहिजे तर ज्याच्याकडे आचारी नाहीय त्याला. पण तिकडेही मीच स्वयंपाक बनवत होतो आणि इकडेही मीच बनवणार आहे. मला माहित आहे प्रेक्षकांना भाकरी किंवा काय आवडतं खायला. त्यामुळे मी ते प्रेक्षकांना चांगलं बनवून देईन, हा प्रयत्न असेल. इतकी वर्ष हे करून मला एक अंदाज आलाय की प्रेक्षकांना कशा प्रकारची कॉमेडी हवी असते.”

हेही वाचा… “एकापेक्षा एक नमुने…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रींचा कॉमेडी व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…

“यावेळी कलर्स मराठीने मला तो प्लॅटफॉर्म दिलाय आणि मला तेच हव होतं की कोणीतरी आता पाठिशी उभं राहण गरजेचं होतं. कारण मला असं वाटायचं की टीमकडे खूप आहे आणि तो सपोर्ट अजूनही मला हवा होता आणि मला वाटतंय की तो सपोर्ट आता मला मिळतोय, त्यामुळे प्रेक्षकांसमोर आम्ही पोहोचतोय.”

हेही वाचा… वंदना गुप्तेंनी भरलं होतं सुनील बर्वेंच्या पहिल्या गाडीतलं पहिलं डिझेल; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा

“मला असं वाटतं की, आता नवीन कुटुंबात आलोय. मी मुद्दाम सांगू शकतो की केदार सर मला रोज एक फोन करतायत हल्ली, एक चॅनेल हेड आहेत ते. त्यांना खूप व्याप आहे, तरी त्यांनी त्यातूनही वेळ काढून फोन करणं आणि विचारणं की, कसं झालंय एडिट, कसं चाललंय, तुला आवडतय ना. एका चॅनेल हेडने दररोज फोन करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यात ते केदार सरांनी करणं. आजच्या धावपळीच्या जगात ही माणसं मला एवढा सपोर्ट करतायत, त्यामुळे माझी जबाबदारीपण वाढलीय आणि मला आनंदपण वाटतोय.”

दरम्यान, निलेश साबळे भाऊ कदमसह ओंकार भोजने, स्नेहल शिदम व सुपर्णा श्याम हे कलाकार नव्याने प्रेक्षकांना हसवण्यासाठी हजर झाले आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या विनोदी कार्यक्रमात या कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरुवात केलीय.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh sable said kedar shinde calls him daily for his new comedy show hastay na hasaylach pahije dvr