हल्ली आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्याचा जणू ट्रेंडच सुरू आहे. यात सामान्यांपासून ते सेलिब्रिटीही मागे नाहीत. ते रोज नवनवीन रील्स, फोटो शेअर करत असतात. आता गणेशोत्सवानिमित्त अनेक सेलिब्रिटींचा गणपतीच्या गाण्यावर डान्स व्हिडीओ पाहायला मिळतात. यामध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांचाही समावेश आहे. याबद्दल अभिनेत्री व दिवंगत निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले थत्तेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
गार्गी फुलेने पोस्टमध्ये लिहिलं, “सोशल मीडिया हे एखाद्याची कला लोकांसमोर सादर करायचं अतिशय प्रभावी माध्यम आहे. रील्स, पोस्ट याद्वारे कलाकार वारंवार व्यक्त होत असतात. पण कधी कधी सिनियर लोकांच्या रील्स पाहिल्या की भीती वाटते. योगासनं, छान गाणी इथपर्यंत समजू शकते. पण पावसात भिजताना, शॉर्टस् घालून भटकंती करताना, गणपतीसमोर उड्या मारताना आपल्या वयाचा यांना विसर पडतो का? कोणाबरोबर बरोबरी करायची आहे यांना? आणि हे जर कामं मिळवण्यासाठी असेल तर काकू, आई, सासू तसेच काका, सासरे, वडील याच भूमिका करताना दिसतात. मग हे वेडेचाळे करण्यामागे नक्की काय कारण आहे? कोणी सांगेल का? असो,” असा प्रश्न तिने केला. गार्गी उवाच आणि पडलेला एक प्रामाणिक प्रश्न असे हॅशटॅग तिने या पोस्टला दिले आहेत.
गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांमध्ये ज्येष्ठ कलाकारांनी भाग घेऊन अशा प्रकारे देवासमोर डान्स करणं योग्य आहे का? असा प्रश्न गार्गीने केला आहे. सोशल मीडियावर सध्या गार्गीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून गार्गीचा फुले थत्तेचा रोख नेमका कुणाकडे आहे? अशी चर्चाही सुरू झाली आहे.