मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली. त्यापैकी एक म्हणजे निळू फुले. करारी आवाज व दमदार अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, मराठी सिनेसृष्टीतील जातीवंत कलाकार अशी ओळख असणारे निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेच लाडके निळू फुलेंनी चार दशकांहून अधिक काळ अविरत काम केलं. निळू फुले जितके अभिनय क्षेत्रात सक्रिय होते तितकेच ते सामाजिक कार्यातदेखील भाग घ्यायचे. अशा या लोकप्रिय निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले-थत्ते यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण, आता मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती गार्गी फुले-थत्ते यांनी नुकतीच दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले-थत्ते आजवर छोटी भूमिका असो किंवा मोठी प्रत्येक भूमिका स्वीकारताना दिसल्या. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून गार्गी या घराघरात पोहोचल्या. या मालिकेतील त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकांमध्ये पाहायला मिळाल्या. याशिवाय त्या हिंदी मालिकांमध्ये झळकल्या. पण आता मराठी मालिकाविश्वातून निवृत्ती घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

‘लेट्सअप मराठी’शी संवाद साधताना गार्गी फुले-थत्ते यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती दिली. यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. गार्गी फुले-थत्ते म्हणाल्या, “मालिकाविश्वातून मी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. कारण मी १० वर्षे काम केलं. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी १० वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिले. खरं सांगू, मालिकेमधलं शेड्यूल म्हणतो, ते कलाकारांसाठी इतकं विचित्र आहे. आवड एवढंच असेल तर मराठी मालिकाविश्वात काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्यच्या असो किंवा इतर, तर खूप त्रास होतो.”

दरम्यान, गार्गी फुले-थत्ते अभिनयाशिवाय राजकारणात सक्रिय आहेत. तसंच आता त्यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. गार्गी यांनी स्वतःचं Solitude Holiday ट्रॅव्हलिंग अ‍ॅप लॉन्च केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आवडत्या कलाकारांबरोबर देश-विदेशात फिरायला मिळणार आहे.