गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आणि जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. अशातच आता ‘स्टार प्रवाह’वर लवकरच नवी मालिका भेटीस येणार असल्याचं जाहीर झालं आहे. कालच्या ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३’ या सोहळ्यात अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी नवी मालिका येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच या मालिकेत कोण कलाकार असणार हे देखील सांगितलं.
हेही वाचा – मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण गौतमी पाटीलला आवडतं; म्हणाली…
‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३’ या सोहळ्यापूर्वी काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये ‘स्वाभिमान’ या मालिकेतील अभिनेता अक्षर कोठारी आणि अभिनेत्री ईशा केसकर पाहायला मिळत होते. त्यामुळे तेव्हापासून ‘स्टार प्रवाह’वर नवी मालिका येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण कालच्या ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३’ या सोहळ्यातून निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यासंबंधिचा व्हिडीओ ‘मराठी टेल बझ’ या एंटरटेन्मेंट इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनची एक भुवई का असते वर? निर्मिती सावंत यांनी सांगितलं त्यामागचं रहस्य
या व्हिडीओत सिद्धार्थ चांदेकर म्हणताना दिसतोय की, “एक नवीन रुपात जुना माणूस आपल्याला भेटायला येतोय. त्याच्याबद्दल तुझं म्हणणं काय आहे?” त्यानंतर निर्मिती सावंत म्हणतात की, “त्याच्याबद्दल काय बोलणार बाबा…तो छोट्या मालकीणीचा मालक आहे. जाताना गेला स्वाभिमानाने आणि येताना लक्ष्मीच्या पावलाने आलाय. स्टार प्रवाहचे मूळ पुरुष आहेत ते. आपण त्यांना काही नाही बोलू शकत.” यावर सिद्धार्थ म्हणतो की, “हो…मी पण असं ऐकलं होतं की, आधी ते लॉन्च झाले मग स्टार प्रवाह लॉन्च झालं.” अशा मजेशीर अंदाजातून निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी ‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका जाहीर केली. या मालिकेतून पुन्हा एकदा अक्षर कोठारी प्रेक्षकांना भेटीस येणार असल्याचं निश्चित झालं आहे.
हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: राहुल वैद्यच्या मुलीची पहिली झलक समोर; बहिणीने केला फोटो शेअर
आता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार? आणि ‘स्टार प्रवाह’वरील कोणती मालिका निरोप घेणार? याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.