सोशल मीडियावर कलाकार मंडळी खूप सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सतत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे कलाकार कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री निशा रावलचा ( Nisha Rawal ) ७ वर्षांच्या लेकाबरोबरचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओमधील लेकाच्या कृतीमुळे निशाला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. याच ट्रोलिंगवर निशाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका इफ्तार पार्टीमध्ये निशा रावल ( Nisha Rawal ) लेकाबरोबर हजेरी राहिली होती. गुलाबी ड्रेसमध्ये ती पाहायला मिळाली होती. यावेळी पापाराझींना पोज देताना तिचा मुलगा सतत तिचं चुंबन घेत होता. यावरून नेटकऱ्यांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं. एक नेटकरी म्हणाला होता, “हा काय प्रकार आहे. जर आई अशी कपडे घालत असेल तर मुलगा सुद्धा काय करणार? मुलाला शिस्तचं शिकवली नाही.” तर दुसरा नेटकरी म्हणाला होता की, मुलाला गंभीर काउंसलिंगची गरज आहे. तसंच तिसरा नेटकरी म्हणालेला, “तो आता लहान राहिलेला नाही.” या ट्रोलिंगवर निशाने प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडेच मुंबईत एक फॅशन इव्हेंट झाला. यावेळी ‘इन्स्टंट बॉलीवूड’ने निशा रावलशी ( Nisha Rawal ) संवाद साधला. तेव्हा ती ट्रोलिंगबद्दल म्हणाली, “त्या व्हायरल व्हिडीओविषयी मला जास्त काही बोलायचं नाही. फक्त एवढंच की, थोडी लाज वाटली पाहिजे. एका आई-मुलाच्या नात्याकडे या नजरेने पाहता आणि हा त्यांचा दोष आहे. त्यामुळे मला याबद्दल काही बोलायचं नाही.”

दरम्यान, निशा रावल ( Nisha Rawal ) वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. २०२१मध्ये निशाने पूर्वाश्रमीचा पती करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. अभिनेत्याने अभिनेत्रीचं डोकं भिंतीवर आपटलं होतं, ज्यामुळे तिला दुखापत झाली होती, असे आरोप निशाने करणवर लावले होते.

निशा व करणने २०२१ मध्ये लग्न केलं होतं. दोघांची पहिली भेट ‘हसते-हसते’मध्ये झाली होती. या चित्रपटात करण ऑफिशियल डिझाइनर होता आणि निशा अभिनेत्री. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि काही काळानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर लग्नाच्या पाच वर्षांनी २०१७मध्ये दोघांना मुलगा झाला, ज्याचं नाव काविश आहे. पण, मुलाच्या जन्मानंतर दोघांचा संस्कार जास्त काळ टिकू शकला नाही.