‘सावळ्याची जणू सावली'(Savalyachi Janu Savali) या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर सावली ही भूमिका साकारत आहे. तर, अभिनेता साईंकित कामत हा सारंग ही भूमिका साकारत आहे. त्याबरोबरच अभिनेत्री सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, मेघा धाडे, भाग्यश्री दळवी असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. आता मालिकेत एक नवीन एन्ट्री होणार आहे. आता कोणता अभिनेता मालिकेत एन्ट्री करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना असल्याचे दिसत आहे.
‘या’ अभिनेत्याची एन्ट्री
सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, काही गुंड सारंगला मारत आहेत. तितक्यात बुलेटवरून एक व्यक्ती येते आणि ती सारंगचा जीव वाचवते. सारंग या व्यक्तीकडे आश्चर्याने पाहत असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना “सावलीच्या विनंतीला ‘देवा’चं उत्तर”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
सावली तारासाठी गाणे गाण्यासाठी गेली आहे. मात्र, तिथे गेल्यानंतर तिला वाटते की, सारंगचा जीव धोक्यात आहे. ती सारंग ठीक आहे का हे पाहण्यासाठी बाहेर जात असतानाच तिला भैरवी अडवते आणि तिला काय सांगितले होते, याची आठवण करून देते. ती तिला म्हणते की, कोणाचा प्राण गेला तरी गाणं संपल्याशिवाय बाहेर जायचं नाही. गाणं सुरू कर, असे म्हणून भैरवी बाहेर जाते. त्यानंतर सावली विठ्ठलाकडे सारंगचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करते. ती विठ्ठलाला प्रार्थना करीत म्हणते, “विठ्ठला, मी माझं वचन निभावलंय. तू तुझं वचन निभाव. माझ्या कुंकवाच्या रक्षणाची जबाबदारी आता तुझी.”
आता सारंगचा जीव वाचविणारा हा अभिनेता कोण? कोणत्या अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री झाली आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असल्याचे पाहायला मिळाले. तर, सावळ्याची जणू सावली या मालिकेत अभिनेता निषाद भोईरची एन्ट्री झाली आहे. याआधी अभिनेत्याने ‘निवेदिता माझी ताई’, ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘आई – मायेचं कवच’, या मालिकांत भूमिका साकारल्या आहेत. त्याबरोबरच ‘पुरुष’ या नाटकातदेखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता हा अभिनेता सावळ्याची जणू सावली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेकांनी ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील त्याच्या या भूमिकेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मालिकेचा प्रोमो शेअर करीत अभिनेत्याला टॅग केले गेले आहे. अभिनेत्यानेदेखील या पोस्ट त्याच्या अकाउंटवर शेअर केल्या आहेत.
आता मालिकेत अभिनेत्याची नेमकी काय भूमिका असणार, सावली-सारंगच्या आयुष्यात त्याच्या येण्याने काही बदल होणार का, सावलीला त्याची मदत होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.