छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचं आज (२४ मे) निधन झालं आहे. ते ५१ वर्षांचे होते. कार्डिअॅक अरेस्टमुळे नितेश यांचा मृत्यू झाला. नितेश यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला दुःखद धक्का बसला आहे. अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितेश यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. पण नितेश यांच्या निधनादरम्यान नेमकं काय घडलं? याबाबत एक माहिती समोर आली आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सुरभी तिवारीने नितेश यांच्या निधनाबाबत ‘नवभारत टाइम्स’ला माहिती दिली. यावेळी सुरभीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. सुरभी म्हणाली, “माझे दिग्दर्शक सिद्धार्थ नागर यांची पोस्ट मी पाहिली. मला यावर विश्वासच बसला नाही. म्हणूनच मी सिद्धार्थ यांना फोन केला. नितेश यांच्या निधनाची बातमी खरी आहे का? असं मी त्यांना विचारलं”.
आणखी वाचा – ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेंचं निधन, कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू
“सिद्धार्थ म्हणाले, हो, इगतपुरीमध्ये तो चित्रीकरण करत होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आला का? असंही मी सिद्धार्थ यांना विचारलं. यावर ते म्हणाले, बहुतेक त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा. पण ही खूप दुःखद घटना आहे. मी नव्वदच्या दशकापासून त्यांना ओळखते. २०१७मध्ये ‘एक रिश्ता साझेदारी का’ या मालिकेमध्ये आम्ही एकत्र कामही केलं. जवळपास आठ महिने आम्ही एकत्रित चित्रीकरण केलं”.
“गेल्या महिन्यातच विमानतळावर आमची भेट झाली. ते चित्रीकरणासाठी जात होते. त्यांनी तेव्हा मला माझ्या चित्रपटाबाबतही विचारलं होतं. त्यांना एक मुलगा आहे. त्यांची पत्नी अर्पिता पांडे यांनीही अभिनेत्री म्हणून याआधी काम केलं आहे”. नितेश ‘अनुपमा’ या मालिकेत शेवटचे दिसले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. याशिवाय ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे.