एकेकाळी नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा रंगली होती. त्यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली होती, पण गडकरींनी ती नाकारली होती. त्यावेळी ते केंद्रीय परिवहन मंत्री होते. नितीन गडकरींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर का नाकारली होती? याचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोच्या आगामी एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहे. या शोमधील काही प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यातील एका प्रोमोमध्ये नितीन गडकरींना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरबद्दल विचारण्यात आलं. नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यानंतर त्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं होतं, पुढे निवडणुका झाल्या आणि ते केंद्रात मंत्री झाले. केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांना ही ऑफर दिली गेली आणि त्यांनी ती नाकारली. यामागचं कारण काय होतं, ते जाणून घेऊयात.
‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर निर्विवादपणे तुमचा दावा होता, तुम्ही मुख्यमंत्री होणार असं सर्वांना वाटत होतं, पण तुम्ही अचानक माघार का घेतली?’ असा प्रश्न अवधूत गुप्तेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विचारला. त्यावर उत्तर देत गडकरी म्हणाले, “मी तेव्हा भाजपाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, मला दिल्लीला जायची इच्छा नव्हती. पण परिस्थिती अशी झाली की मी भाजपाचा अध्यक्ष झालो आणि मला दिल्लीला जावं लागलं. एकदा दिल्लीला गेल्यानंतर मग मी ठरवलं की आता महाराष्ट्रात वापस नाही यायचं.”
दिल्लीला जायची इच्छा नसताना बोलावण्यात आलं, पण एकदा दिल्लीला गेल्यावर केंद्राच्या राजकारणाचा भाग व्हायचं आणि महाराष्ट्रात परत न येण्याचं ठरवलं असं गडकरींनी सांगितलं.