अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं एकत्र यावं, अशी चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, अशा आशयाचे बॅनर्सही झळकले. अशातच भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही भावांबद्दल बाळासाहेबांची एक इच्छा अपूर्ण राहिल्याचा खुलासा केला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर का नाकारली होती? नितीन गडकरी खुलासा करत म्हणाले, “मी तेव्हा…”
नितीन गडकरी यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंबरोबरची मैत्री आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं. ते म्हणाले, “राज ठाकरेंचं व्यक्तिमत्त्व दिलखुलास आहे. राजकारण, राजकारणातील भूमिका वेगवेगळ्या असतात. राज शिवसेनेत होते, तेव्हापासूनच त्यांना नवनवीन गोष्टींचा ध्यास होता. त्यांनी घर बांधलं, त्या घरातील इंटिरियर मी बारकाईने पाहिलं. त्यांच्यामध्ये एक कलात्मकता आहे, ते प्रत्येक गोष्ट फार विचारपूर्वक प्लॅन करून करतात, त्यामुळे त्यात परफेक्शन असतं. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.”
राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला, त्यानंतरच्या पहिल्या भेटीत तुम्ही काही सल्ला दिला होता का? असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला. उत्तर देत ते म्हणाले, “बाळासाहेब जेव्हा लीलावती रुग्णालयात होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यानंतर काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. मी भेटलो तेव्हा त्यांनी मला बसायला सांगितलं आणि सगळ्यांना बाहेर पाठवलं. ते मला म्हणाले, ‘नितीन एक काम कर उद्धव आणि राजमध्ये मैत्री कर’. राज यांनी शिवसेना सोडू नये, यासाठी मी खूप प्रयत्न केले. मी उद्धव ठाकरेंनाही खूप वेळा समजावून सांगितलं, मी प्रयत्न केले पण दुर्दैवाने मला त्यात यश आलं नाही.”
72 Hoorain: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला चित्रपट, कमावले फक्त ‘इतके’ लाख रुपये
राजकारणापासून मैत्री व नाती दूर ठेवायला हवीत, असंही गडकरींनी सांगितलं. “राजकारणात काहीही होऊद्या, पण एक कुटुंब म्हणून आपण एकत्र असलो की आपली ताकद कितीतरी पटीने वाढते. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहून काम करावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. मला माहीत नाही की काळाच्या ओघात काय होईल, कारण राजकारणातून बरंच पाणी वाहून गेलंय. पण माझं बाळासाहेबांवर खूप प्रेम होतं, त्यांचं माझ्यावर होतं. त्यांच्या निधनाआधीचं ते बोलणं मला अजूनही लक्षात आहे. राजकारण वेगळं मैत्री वेगळी, राजकारण वेगळं संबंध वेगळे, यात अंतर ठेवूनच आपण वागायला हवं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे योग्य नाही आणि ते करूही नये,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.