नेत्यांची पक्षांतरं असो वा राजकारणाबद्दलची चर्चा. एखादी राजकीय उलथापालथ झाली की बऱ्याचदा सर्वसामान्य मतदाराला एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे आमच्या मताला व्हॅल्यू आहे की नाही? पण याबद्दल नितीन गडकरी यांनी मतदारांनाच जबाबदार धरलं आहे. त्यांच्यामते, फक्त मतदारच राजकारणात बदल घडवून आणू शकतात.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या नवीन भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. त्यांनी मतदारांना खुपणाऱ्या गोष्टींना मतदारच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. “या देशात विचारभिन्नता हा प्रॉब्लेम नाही, तर विचारशून्यता हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचा विचाराचे असाल, कम्युनिस्ट असाल, समाजवादी असाल पण तुमच्या विचारांशी तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टींना तुम्हीच जबाबदार आहात” असं ते म्हणाले.
नितीन गडकरी यांनी यावेळी मुलीच्या लग्नाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलगा शोधताना किती विचार करता. मुलगा कसा असला पाहिजे, मुलीची सासू कशी असली पाहिजे, त्याचे आई-वडील कसे असले पाहिजे, घर कसं असलं पाहिजे? मग मत देताना का गांभीर्याने विचार करत नाहीत? तुम्ही म्हणता हा माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला मत देतो, हा माझ्या भाषेचा आहे म्हणून मत देतो. ज्या दिवशी जनता हे ठरवेल की आम्ही देणारं मत विचारपूर्वक देऊ, आम्ही चुकीच्या माणसाला आमचं मत देणार नाही, त्यादिवशी राजकारणात आपोआप बदल होतील,” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, नितीन गडकरी या आठवड्यात ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये दिसणार आहेत. यामध्ये त्यांनी त्यांना खुपणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे. तसेच राजकारण व इतर प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली आहेत.