छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा गेले काही दिवस खूप चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आणि त्यांच्या जागी नवीन कलाकारांची वर्णी लागली. परंतु आजही प्रेक्षकांच्या मनात जुने कलाकार आहेत. त्यामुळे अनेकदा नव्या कलाकारांची जुन्या कलाकारांशी तुलना प्रेक्षकांकडून केली जात आहे.
या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकतची जागा आता नितीश भलूनीने घेतली आहे. ही भूमिका तो कशी साकारतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असले तरीही अनेकांकडून राज आणि त्याची तुलना केली जात आहे. यावरून त्याला ट्रोलही केलं जात आहे. आता यावर नितीशने भाष्य केलं आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “राजने त्याच्या शैलीमध्ये ही भूमिका साकारली. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची आपली अशी पद्धत असते. त्याचप्रमाणे कोणताही कलाकार एखादी भूमिका साकारतो. आता मी टप्पू या व्यक्तिरेखेला माझ्या शैलीमध्ये प्रेक्षकांच्या समोर आणू इच्छितो. त्यातून मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा आणि त्यांच्याकडून प्रेम मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”
दरम्यान लवकरच नितीश नव्या टप्पूच्या रुपात पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. यापूर्वी नितीश ‘मेरी डोली मेरे अंगना’मध्ये दिसला होता.