महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहेत. नितीश यांनी त्यांच्या आयएएस अधिकारी पत्नी स्मिता घाटे यांच्यावर मुलींना भेटू देत नसल्याचे गंभीर आरोप केले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पत्नीशी त्यांचं नातं कसं आहे, याबाबत सांगितलं.
काही दिवसांपूर्वी नितीश भारद्वाज यांनी भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांना मेल लिहून त्यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी मेलमध्ये लिहिलंय स्मिता त्यांना त्यांच्या दोन्ही मुलींना भेटू देत नाही आणि त्यांचा मानसिक छळ करत आहे. नितीश यांच्या तक्रारीनंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर ‘टेली टॉक इंडिया’ ला दिलेल्या एका मुलाखतीत नितीश यांनी खुलासा केला की त्यांच्यात व त्यांच्या पत्नीमध्ये १३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाहीत.
‘महाभारत’ मधील ‘कृष्णा’चे IAS अधिकारी असलेल्या एक्स पत्नीवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार देत म्हणाले…
मला घटस्फोट हवाय, कारण…
“मी पुण्यातील थ्री बीएचके घराचे ७० टक्के पैसे भरले, पण स्मिताने मला न विचारता ते घर भाड्याने दिलं. ती नोकरी करत असूनही मला पैसे मागायची. ती खोटं बोलते. मला तिच्यापासून घटस्फोट हवाय, कारण माझ्यासाठी या नात्यात काहीच उरलेलं नाही. मी तिच्या मानसिक, भावनिक व शारीरिक छळाचा पीडित आहे. तिने मला त्रासच दिलाय. आमच्यात १३ वर्षे शारीरिक संबंध नव्हते. मी पुण्याला जायचो, पण ती वेगळ्या खोलीत राहायची,” असं नितीश म्हणाले. तसेच आपलं हे दुसरं तर स्मिता यांचं हे तिसरं लग्न होतं, असा दावाही नितीश यांनी केला.
स्मिता घाटे यांनी दिलेली प्रतिक्रिया
“नितीश भारद्वाज चार वर्षांत फक्त तीन वेळा वैयक्तिकरित्या त्यांच्या मुलींना भेटले आहेत. मी ऑक्टोबर २०१८ आणि २०१९ मध्ये माझ्या मुलींना आणि त्यांच्या वडिलांना भेटायला मुंबईला घेऊन गेले होते, तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्या घरात राहण्याची परवानगी नाकारली आणि मला व माझ्या मुलींना स्वखर्चाने हॉटेलमध्ये राहण्यास भाग पाडले. मी मुलींना कधीच त्यांच्या वडिलांना भेटण्यापासून रोखलेलं नाही. त्यांनी कधीच आर्थिक मदत केली नाही, ते सहानुभूती मिळविण्यासाठी खोटे आरोप करत आहेत,” असं स्मिता घाटे त्यांची बाजू मांडताना म्हणाल्या होत्या.