छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आणि त्यांच्या जागी नवीन कलाकारांची वर्णी लागली. या कलाकारांना प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम दिलं आणि मालिका पुढे जात राहिली. या मालिकेत टप्पू नावाच्या पात्राला दोन वेळा रिप्लेस करण्यात आलं.
सुरुवातीला भव्य गांधी या मालिकेत टप्पूची भूमिका साकारत होता, पण काही कारणास्तव त्याने ही मालिका सोडली. त्यानंतर त्याच्या जागी निर्मात्यांनी राज अनाडकतला टप्पू म्हणून मालिकेत आणलं. राजने बरीच वर्षे टप्पूची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. पण काही महिन्यांपूर्वी त्यानेही मालिका सोडली. त्यानंतर निर्माते नव्या टप्पूच्या शोधात होते. अखेर त्यांचा शोध पूर्ण झाला आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांना आता टप्पूची भूमिका साकारण्यासाठी नवीन कलाकार मिळाला आहे. नवीन टप्पूसह, निर्माते शो पुढे नेण्यासाठी तयार आहेत. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी नितीश भलूनीला कन्फर्म केलं आहे. लवकरच नितीश नव्या टप्पूच्या रुपात पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. यापूर्वी नितीश ‘मेरी डोली मेरे अंगना’मध्ये दिसला होता.
दरम्यान, आतापर्यंत मालिकेतील टप्पूची आई म्हणजेच दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, सोढीची भूमिका साकारणारा कलाकार, शैलेश लोढा, नेहा मेहता यांच्यासह अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. या कलाकारांच्या जागी नवीन कलाकारांना संधी देत निर्माते ही मालिका पुढे नेत आहेत.