सोनी मराठी वाहिनीने नववर्षानिमित्त काही दिवसांपूर्वी एका नव्या मालिकेची घोषणा केली होती. प्रेक्षकांना या मालिकेद्वारे भावा-बहिणीच्या गोड नात्याची गोष्ट अनुभवता येणार आहे. येत्या १५ जानेवारीपासून भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित ‘निवेदिता, माझी ताई!’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोटेसे बहीण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ… या कवितेच्या ओळी आठवल्या की मनात आपल्या बालपणीच्या आठवणी हमखास दाटून येतात. कितीही भांडली तरीही बहीण-भावाचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असंच काहीसं असतं. ‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेतून बहीण-भावाच्या अशाच एका अनोख्या नात्याची गंमत लवकरच उलगडणार आहे. सध्या या मालिकेचे अनेक प्रोमोज व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : जाऊ बाई गावात : मकरसंक्रातीला हार्दिक जोशीला मिळणार खास सरप्राईज! राणादाच्या शोमध्ये येणार पाठकबाई

‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेमध्ये मोठ्या बहिणीच्या भूमिकेत अभिनेत्री एतशा संझगिरी प्रेक्षकांना दिसेल. यापूर्वी तिने ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच ‘निवेदिता, माझी ताई!’मध्ये तिच्या लहान भावाची भूमिका रुद्रांश चोंडेकर साकारणार आहे. या भावा-बहिणीच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्यावर नेमकं काय घडणार याचा प्रवास मालिकेत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

हेही वाचा : “बायकोने ५ लाखांची FD मोडली अन्…”, अंशुमन विचारेने ‘असं’ घेतलं हक्काचं घर; म्हणाला, “बँकेचा हफ्ता…”

भावा-बहिणीच्या विश्वात एखाद्याच्या येण्याने खरंच बदल घडतो का? ‘निवेदिता, माझी ताई!’ मालिकेमध्ये अशोक फळदेसाई एका डॅशिंग तरुणाच्या भूमिकेत म्हणजेच यशोधनच्या भूमिकेत दिसणार आहे. यशोधन आणि निवेदिता यांची मॅजिकल लव्हस्टोरी ही या मालिकेचा टर्निंग पॉइंट असणार आहे. निवेदिता, असीम आणि यशोधन या तिघांच्या प्रेमाची एक आगळीवेगळी गोष्ट ‘निवेदिता, माझी ताई!’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. असीमची लाडकी ताई आणि यशोधनची स्वप्नपरी या दोघांच्या निर्व्याज प्रेमात निवेदिताला तारेवरचीच कसरत करावी लागणार हे नक्की. कधी प्रेमाने तर कधी लबाडीने आपल्या निवेदिता ताईला कायम आपल्याजवळ ठेवू पाहणारा असीम आणि निवेदिताबरोबर आपल्या भावी आयुष्याची स्वप्नं पाहणारा यशोधन यांची गमतीशीर गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हेही वाचा : ‘पोरी तुझे नादान’ फेम अभिनेत्रीने २२ व्या वर्षी घेतली ड्रीम कार; म्हणाली, “साताऱ्यातील फलटण या गावातून…”

दरम्यान, ‘निवेदिता, माझी ताई!’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या १५ जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता पाहता येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nivedita mazi tai new serial starts on sony marathi from 15th jan aetashaa sansgiri and ashok phaldesai lead roles sva 00