‘झी गौरव सोहळा’ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून अनेक मान्यवर व प्रतिष्ठित कलाकारांच्या सन्मानाचा सोहळा असतो. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव या सोहळ्यात करण्यात येतो, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार व प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच नुकताच ‘झी चित्र गौरव २०२५’ ( Zee Gaurav Awards 2025 ) हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. यंदाचं हे सोहळ्याचं २५ वं वर्ष होतं, त्यामुळे या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. याच ‘झी गौरव’ पुरस्कारामधील एक मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘जीवनगौरव’ हा पुरस्कार आणि यंदाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या त्या महानायिका निवेदिता सराफ ( Nivedita Saraf )
अनेक मालिका, चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून गेली वर्षानुवर्षे निवेदिता सराफ रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. कलाविश्वातील हे योगदान लक्षात घेऊन यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात निवेदिता सराफ ( Nivedita Saraf ) यांचा जीवनगौरव या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यानिमित्त त्यांच्यावर चाहते वर्गासह कलाकार मंडळींकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच निवेदिता ( Nivedita Saraf ) यांच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारानिमित्त सचिन व सुप्रिया पिळगांवकरांनीही ( Sachin And Supriya Pilgaonkar ) त्यांचे कौतुक केलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आमच्या घरात दोन जीवनगौरव पुरस्कार आल्याची भावना व्यक्त केली.
नेमकं काय म्हणाले सचिन व सुप्रिया पिळगांवकर?
याबद्दल सचिन पिळगांवकर ( Sachin Pilgaonkar ) असं म्हणाले की, “आमच्या कुटुंबात आलेला हा दुसरा जीवनगौरव आहे. आमच्या कुटुंबात पहिला जीवनगौरव मिळाला तो अशोक सराफला. त्यानंतर आता दुसरा निवेदिताला मिळाला आहे”. पुढे सुप्रिया पिळगांवकर ( Supriya Pilgaonkar ) म्हणाल्या की, “हे वर्षच खूप खास होतं. अशोक भाईंना ( Ashok Saraf ) ‘महाराष्ट्र भूषण’ मिळालं, नंतर ‘पद्मश्री’ मिळालं आणि आता निवेदिताला ‘जीवनगौरव’ हा पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब खूप खूश आहे. आम्ही अगदी आनंदात न्हाऊन निघालो आहोत.”
दरम्यान, सुप्रिया पिळगांवकर ( Supriya Pilgaonkar ) या लाडक्या मैत्रिणीच्या हस्ते निवेदिता यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर निवेदिता यांना मंचावर आमंत्रित करण्यात आलं, तेव्हा त्यांनी “काय बोलू, मी खूप भावनिक झालीये. हा पुरस्कार खरंतर माझ्या माहेरचा पुरस्कार आहे” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. येत्या ८ मार्च रोजी ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ ( Zee Gaurav Awards 2025 ) हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.