मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ (Nivedita Saraf). नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांत त्यांचा मुक्तपणे वावर आहे. त्यामुळे आज त्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अभिनेत्री असण्याबरोबरच निवेदिता सराफ या एक यशस्वी उद्योजिका आणि युट्यूबरदेखील आहेत. निवेदिता सराफ यांचं स्वत:चं ‘निवेदिता सराफ रेसिपी’ या नावाने एक युट्यूब चॅनेल आहे. यावर त्या पारंपरिक पदार्थांपासून पाश्चात्य पद्धतीच्या पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडीओ शेअर करत असतात.
तसंच त्या आपल्या या रेसिपीच्या युट्यूब चॅनेलवर अनेक कलाकारांना बोलावत असतात. अनेकांच्या विविध पदार्थांच्या फर्माइशही पूर्ण करत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या मालिकेतील ऑनस्क्रीन सुनेची एक फर्माइश पूर्ण केली आहे. निवेदिता सराफ सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ (Aai Ani Baba Retire Hotyat) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. याच मालिकेतील एका अभिनेत्रीची फर्माइश त्यांनी पूर्ण केली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे पालवी कदम (Palvi Kadam).
पालवीने ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेमध्ये स्विटी ही निवेदिता यांच्या सुनेची भूमिका साकारली आहे. त्यांच्यातील सासू-सुनेचा खास बॉण्ड मालिकेत पाहायला मिळतो. मालिकेतील स्विटी या ऑनस्क्रीन सुनेसाठी निवेदिता यांनी खास पदार्थ बनवला तो म्हणजे ‘पनीर मुमताज’. निवेदिता या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे त्या आपल्या कामानिमित्तची माहिती शेअर करत असतात. तसंच त्यांच्या रेसिपीचे काही खास व्हिडीओही शेअर करत असतात.
अशातच त्यांनी पालवीने ‘निवेदिता सराफ रेसिपी’मध्ये हजेरी लावल्याचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओसह त्यांनी असं म्हटलं आहे की, “पनीरची शानदार मेजवानी – पनीर मुमताज! खास पालवी कदम हिच्या फर्माइशवरून”. या व्हिडीओमध्ये निवेदिता यांच्या चेहऱ्यावर पदार्थ बनवतानाचा आनंद दिसत आहे. तर पालवीनेही त्यांना पदार्थ करण्यासाठी मेहनत केल्याचे यात दिसत आहे.
दरम्यान, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेत पालवी कदमने साकारलेली स्वीटी सर्वांचं मन जिंकत आहे. पालवीच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतं आहे. शिवाय तिच्या आणि निवेदिता यांच्या मालिकेतील खास नात्यालाही प्रेक्षकांकडून पसंती मिळताना दिसते. अशातच निवेदिता यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओलाही चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.