ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबरच निवेदिता सराफ यांनी कला क्षेत्राला दिलेलं योगदान मोठं आहे. निवेदिता यांनी आजवर मराठी मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रांत उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. शिवाय हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम करत आपला ठसा उमटवला. मालिकांबरोबर निवेदिता सराफ यांनी नाटकांमध्येही काम केलं आहे. नुकतंच निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्याबाबत एक खुलासा केला आहे. अशोक सराफ त्यांना खूप ओरडतात असं त्या म्हणाल्या आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता यांनी याबाबतचा एका किस्सा सांगितला आहे.
हेही वाचा- ‘कोण होणार करोडपती’मध्ये रंगणार मैत्रीचे किस्से; महेश मांजरेकर, शिवाजी साटम लावणार विशेष भागात हजेरी
‘वाडा चिरेबंदी’ या नाटकात काम करत असताना अशोक सराफ यांनी त्यांना काय सल्ला दिला याची आठवण त्यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, “वाडा चिरेबंदी’ नाटकात काम करताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींबरोबर चर्चा झाली. त्याआधी मी ते नाटक त्रिनाट्य धारामध्ये बघितलं होतं. चंदूकडे वाचनासाठी गेले तेव्हा पोटात गोळा आला होता. त्या भाषेत मला बोलायला जमणार नाही, असं घरी आल्यावर मी अशोकला सांगितलं. तेव्हा अशोक म्हणाला, जमणार नाही म्हणून प्रोजक्टला नकार देणं सोप्प आहे. पण तू ते ठरवून तुझी पाटी कोरी कर आणि तुझ्या दिग्दर्शकाला फॉलो कर. १५ दिवसांनीही तुला जमलं नाही तर चंदू येऊन तुला सांगेल.”
हेही वाचा- यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले…
अशोक सराफ यांच्या सल्ल्यानंतर निवेदिता यांनी पुन्हा त्या भूमिकेवर काम केलं. त्यानंतर ‘वाडा चिरेबंदी’ नाटकात साकारलेली त्यांची भूमिका खूप गाजली. निवेदिता पुढे म्हणाल्या, “अशोक हा खूप मोठा नट आहे. मी त्याची पत्नी असण्याबरोबरच त्याची चाहती आणि शिष्यही आहे. आमच्यातील मैत्रीपूर्ण नातं आम्ही दोघंही जपतो. तो स्वत: परफेक्शनिस्ट असल्यामुळे मीही परफेक्शनिस्ट असावे, असा त्याचा आग्रह असतो. तो माझ्या कामाची जरा जास्तच चिकित्सा करतो. मला खूप ओरडतो. त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले.”