रविवारी वैशाली ठक्करने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ती काही दिवसांपासून इंदौरला वास्तव्याला होती. आत्महत्येची बातमी मिळताच पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. तिच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये वैशालीने आत्महत्या करण्यासाठी तिला राहुल नवलानी प्रवृत्त केले आहे असे लिहिले आहे. मिळालेल्या सबळ पुराव्यावरुन राहुलवर भारतीय दंड संहितेमध्ये नमूद केलेल्या कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे वैशालीची कारकीर्द सुरु झाली होती. तिने ‘ये वादा रहा’, ‘ससुराल सिमर का’, ‘लाल इश्क’ यांसारख्या काही मालिकांमध्ये काम केले होते. ती सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने स्वत:चे यूट्यूब चॅनलसुद्धा सुरु केले होते. या चॅनलला एक लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करत आहेत. वैशालीच्या यूट्यूब चॅनलवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तिने २० सप्टेंबर रोजी यूट्यूबवर पोस्ट केला होता.
आणखी वाचा – “दिवाळी कुठे साजरी करू…” उर्वशी रौतेलाचा प्रश्न; चाहते म्हणाले, आधी ऋषभची…
सप्टेंबर महिन्यामध्ये तिला व्हायरल तापामुळे दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिने हा व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “इकडे या.. मला काहीतरी सांगायचंय. आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे. फास्ट फूड, मोठमोठ्या पार्ट्या, दारुसारखी व्यसने यांच्यापासून लांब रहा. आजारी असल्यामुळे मला इथे (दवाखान्यात) राहावे लागत आहे. यामुळे चॅनलवर पोस्ट होणाऱ्या व्हिडीओंचे प्रमाण कमी झाले आहे. पण मी लवकरच बरी होऊन तुम्हाला भेटायला येणार आहे.”
वैशालीच्या या व्हायरल व्हिडीओखाली तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये ‘इतरांना समजावणारी आपल्याला सोडून गेली’ अशी भावनिक कमेंट केली आहे. तिच्या निधनामुळे मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरली आहे.