‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ओंकार भोजनेला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. छोट्या पडदा, रंगभूमी ते अगदी चित्रपटांपर्यंत अशा सगळ्या माध्यमांमध्ये ओंकारने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात त्याने एक कविता सादर केली. सध्या याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
ओंकार भोजने सध्या महेश मांजेकरांची निर्मिती असलेल्या ‘करून गेलो गाव’ या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. या नाटकातील एका प्रवेशादरम्यान अभिनेता ‘तू दूर का…’ ही कविता लाइव्ह सादर करतो. या कवितेचा व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासून प्रत्येक कार्यक्रमात ही कविता सादर करण्यासाठी ओंकारकडे आग्रह धरला जातो.
‘करून गेलो गाव’ या नाटकातील एक प्रवेश भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांनी ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात सादर केला. या दरम्यान त्याने पुन्हा एकदा या कवितेचं सादरीकरण केलं.
‘तू दूर का, अशी तू दूर का…मी असा मजबूर का’ असे या कवितेचे बोल आहेत. ओंकारची ही कविता सोशल मीडियावर व नेटकऱ्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. अभिनेत्याने कविता सादर केल्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ओंकारची ही कविता ऐकून काही कलाकार भारावून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ओंकार भोजनेला कविता करण्याची फार आवड आहे. आता लवकरच तो डॉ. निलेश साबळेबरोबर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या विनोदी कार्यक्रमात झळकणार आहे. हा नवीन शो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर येत्या २० एप्रिलपासून रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.