काही मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या असलेल्या पाहायला मिळतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘पारू’ (Paaru) ही अशा लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेत सतत काहीतरी नवीन घडताना दिसते. त्यामुळे पुढच्या भागात काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली दिसते. आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आदित्यची होणारी पत्नी अनुष्का अहिल्यादेवी किर्लोस्करकडे आदित्य व पारूची तक्रार करताना दिसत आहे.
अनुष्का पारू-आदित्यची अहिल्याकडे तक्रार करणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अनुष्का संतापात असून तिने अहिल्यादेवी किर्लोस्करला फोन केला आहे. ती फोनवर म्हणते, आदित्यला माझ्याबरोबर शॉपिंगला यायचं नव्हतं, पारूबरोबर जंगलात जायचं होतं तर त्याने मला सरळ-सरळ सांगायचं ना? आदित्य माझ्यापेक्षा जास्त पारूमध्ये इनव्हॉल्व आहे. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की पारू व आदित्य जंगलात अडकले आहेत. त्यांनी तिथे एक शेकोटी पेटवली आहे. शेकोटीशेजारी ते उभे आहेत. तितक्यात पारू साप-साप म्हणत आदित्यला मिठी मारते. आदित्य तिला साप गेलाय असे समजावतो. त्यानंतर ते एकमेकांकडे पाहत असल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अनुष्का पारु आणि आदित्यबद्दल अहिल्याबाईना सांगणार!”, अशी कॅप्शन दिली आहे.
‘पारू’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे आदित्य, अनुष्का व पारू हे बाहेरगावी गेले आहेत. यानिमित्ताने अनुष्का व आदित्य एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवतील असा उद्देश आहे. ते सगळे एका फार्महाऊसवर थांबले असून तिथे पारूची नानूबरोबर ओळख होते. नानू व पारू जंगलात फिरण्यासाठी जातात. नानूला फूल आणण्यासाठी पाठवून पारू जंगलात दुसरीकडे जाते. नानू तिला शोधतो, पण त्याला ती सापडत नाही. शेवटी वाट पाहून आदित्य पारूला शोधण्यासाठी जातो. खूप शोधाशोध केल्यानंतर आदित्यला पारू सापडते. आता ते दोघेही जंगलातच असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. दुसरीकडे आदित्यचा फोन लागत नसल्याने शॉपिंगसाठी चाललेली अनुष्का पुन्हा फार्महाऊसवर जाते, तर तिथे आदित्य नसल्याचे तिला समजते.
आता अनुष्काने केलेली तक्रार ऐकून अहिल्यादेवी किर्लोस्कर काय निर्णय घेणार, आदित्य पारूच्या प्रेमात पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.