पडद्यावर दिसणारे कलाकार हे त्यांच्या भूमिकांबरोबरच अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे, खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करतात. सोशल मीडियामुळे कलाकारांच्या आयुष्यात काय चालले आहे हे काही प्रमाणात चाहत्यांना जाणून घेता येते. आता पारू (Paaru) मालिकेतील अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर कार घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
श्रुतकिर्ती सावंतने घेतली नवी कार
‘पारू’ मालिकेत दामिनीची भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री श्रुतकिर्ती सावंत (Shrutkirti Sawant)ने नुकतीच एक गाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबाबरोबर दिसत आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असल्याचे पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ही गाडी टाटा कर्व (Tata Curvv) या कंपनीची असल्याचे दिसत आहे. तिने गाडी घेतल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे दिसत आहे. या मालिकेत प्रीतमची भूमिका साकारणारा अभिनेता अनुजनेदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रुतकिर्ती सावंतने पारू मालिकेत साकारलेली भूमिका इतर पात्रांपेक्षा वेगळी असल्याने लक्ष वेधून घेते. कट कारस्थान करीत असली तरी तिच्या विनोदी पद्धतीने ती प्रेक्षकांना खळखळून हसवते. पूर्णत: सकारात्मक नसली तरी ही भूमिका पूर्णत: नकारात्मक नसल्याचे पाहायला मिळते. अभिनेत्रीला झी पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. तिच्या भूमिकेबरोबरच अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील चर्चेत असते. अनेक गोष्टी ती चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.
दरम्यान, ‘पारू’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला असून दिशा पु्न्हा एकदा किर्लोस्करांच्या आयुष्यात आली आहे. बहिणीच्या मदतीने ती किर्लोस्करांना उद्ध्वस्त करायचे या हेतून परतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे पारू किर्लोस्करांवर संकट येण्याआधी त्याला सामोरे जाण्याचा निर्धार करताना दिसत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, पारू दिशा-अनुष्काच्या कट कारस्थानाला कशी सामोरी जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.