राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज ( २० मे ) १३ मतदारसंघांमध्ये मतदान करण्यात आलं. मुंबईतल्या सहा मतदारासंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सामान्य लोकांपासून ते राजकीय व कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु, ऐन मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याच्या तक्रारी काही लोकांकडून करण्यात आल्या. ‘पारू’ मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीला देखील असाच अनुभव आला.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला सध्या घरोघरी पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘पारू’ मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच यामधील अहिल्यादेवींचं पात्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, त्यांच्याभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरतं. अहिल्यादेवी किर्लोस्कर ही वजनदार भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहे.
हेही वाचा : कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी; साकारणार ‘ही’ भूमिका
‘पारू’ मालिकेचं शूटिंग सध्या मुंबईपासून दूर साताऱ्यात चालू आहे. त्यामुळे खास मतदान करण्यासाठी मुग्धा कर्णिक साताऱ्याहून ६ तासांचा प्रवास करून मुंबईत आली होती. परंतु, एवढ्या लांबून मतदानासाठी येऊनही अभिनेत्रीला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. यासंदर्भात अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून माहिती दिली आहे.
“फक्त मतदान करण्यासाठी मी ६ तासांचा प्रवास करून मुंबईत आले. पण, येथील इतर काही लोकांप्रमाणे मला माझंही नाव मतदार यादीत सापडलं नाही. गेली २० वर्षे मी सलग मतदान करत आहे. पण, यावर्षी मला माझा हक्क बजावता येणार नाही. मुंबईकरांनो! कृपया आणि तुमचं नाव शोधा आणि मगच मतदान करा” अशी पोस्ट शेअर करत मुग्धा कर्णिक नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Video: पहिल्यांदाच दिसला दीपिका पादुकोणचा बेबी बंप; मतदानानंतर गर्दीत पत्नीची काळजी घेताना दिसला रणवीर सिंग
मुग्धा कर्णिक ही मूळची मुंबईची आहे. परंतु, सध्या साताऱ्यात ‘पारू’ मालिकेचं शूटिंग चालू असल्यामुळे ती रोजच्या शूटिंगमध्ये व्यग्र असते. फक्त मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मुग्धाने सातारा ते मुंबई असा ६ तासांचा प्रवास केला. पण, ऐनवेळी मतदार यादीत नाव न आढळल्याने तिला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.