अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar) यांनी १४ डिसेंबर २०२४ ला लग्नगाठ बांधली. या सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. लग्नाच्या काही दिवस आधी किरण गायकवाडने दोघांचे फोटो शेअर करीत ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची माहिती चाहत्यांना दिली होती. किरण गायकवाडच्या लग्नाला अनेक सहकलाकारांनी हजेरी लावली होती. आता अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत किरण गायकवाडच्या लग्नातील एक झलक दाखवली आहे.
‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ
अभिनेत्री पूर्वा शिंदेने ‘लागिर झालं जी’ मालिकेतील तिचा सहकलाकार किरण गायकवाडच्या लग्नात तिच्या इतर कलाकार मित्रांबरोबर हजेरी लावली होती. लग्नातील एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना किरण व वैष्णवीला टॅग करीत तिने त्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता महेश जाधवने स्वत:ला टॅग करीत, लग्नातील सर्वांत आनंदी लहान मुले, असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये ती अत्यंत उत्साही दिसत आहेत. महेश जाधव व पूर्वा आनंदाने डान्स करताना दिसत आहेत. किरण गायकवाडची मंडपात एन्ट्री कशी झाली हेदेखील पाहायला मिळत आहे. पूर्वाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘घरोघरी मातीच्या चुली’फेम अभिनेता सुमित पुसावळेदेखील त्याच्या पत्नीसह उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. हे जोडपेदेखील किरण-वैष्णवीच्या लग्नात मजा करताना दिसत आहे.
पूर्वा शिंदे, महेश जाधव, सुमित पुसावळे यांच्याबरोबरच निखिल चव्हाण, अमरनाथ खराडे, राहूल मगदुम अशा सर्व कलाकारांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
पूर्वा शिंदेबद्दल बोलायचे, तर सध्या ती झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत खलनायिका दिशाची भूमिका साकारताना दिसत आहे. दिशाने कटकारस्थान अहिल्यादेवी किर्लोस्कर व तिच्या संपूर्ण कुटुंबासमोर आले असून, तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आता दिशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अनुष्का किर्लोस्करांच्या आयुष्यात आली असून, तिने त्या सर्वांची मने जिंकली आहेत. इतकेच नव्हे, तर तिचे आदित्यबरोबर लग्नही ठरले आहे. आता दिशा तुरुंगातून कधी बाहेर येणार आणि अनुष्का तिच्या योजनेत यशस्वी होणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd