‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत शरयूने मध्यवर्ती ‘पारू’ची भूमिका साकारली आहे. अल्पावधीत शरयूची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
अभिनेत्री शरयू सोनावणेची ‘पारू’ मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. काही काळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. तसंच साध्या भोळ्या ‘पारू’ची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच ‘पारू’ म्हणजेच शरयूने चाहत्यांना आज सुखद धक्का दिला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शरयू लग्नाचे फोटो शेअर केले आहेत; जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. पण शरयूचा खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचा आहे तरी कोण? जाणून घ्या…
गेल्या वर्षी शरयूने ‘पिंकीचा विजय असो’ मालिका सोडल्यानंतर साखरपुडा झाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. १९ सप्टेंबर २०२३ला अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अॅण्ड एंगेज…गणपती बाप्पा मोरया.” त्यामुळे शरयूचा फक्त साखरपुडा झाल्याचं सगळ्यांना माहित होतं. पण आज तिने लग्न झाल्याचा देखील खुलासा केला.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शरयूने फोटो शेअर करत लिहिलं, “३६५ दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम. आमच्या सुंदर प्रवासाचे एक वर्ष साजरे करत आहोत.” या फोटोमध्ये शरयू व तिचा नवरा शाही लूकमध्ये पाहायला मिळत आहे. शरयू पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत दिसत असून तिचा नवरा पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Video: “खूपच भारी दिसतायत…”, अविनाश नारकरांच्या डान्स नव्हे तर नव्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष, म्हणाले…
शरयूचा नवऱ्याचं नाव जयंत लाडे असं आहे. जयंत मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे. अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती. याशिवाय उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, संजय जाधव, भरत गणेशपुरे अभिनीत ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील शरयूच्या नवऱ्याने केली होती. या चित्रपटात शरयू सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.