‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. पारू, आदित्य, अहिल्यादेवी, दामिनी, श्रीकांत, प्रीतम, प्रिया, मोहन, दिशा, गणी ही प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. सध्या सोशल मीडियावर गणी आणि प्रियाच्या जबरदस्त डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘पारू’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी ट्रेडिंग गाण्यावर डान्स व्हिडीओ करत असतात. सध्या ‘नटीनं मारली मिठी’ हे गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. याच गाण्यावर अलीकडे प्रिया म्हणजे अभिनेत्री संजना काळेने गणी म्हणजेच बालकलाकार देवदत्त घोणेसह डान्स केला होता. दोघांचा हा डान्स व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
संजना काळेना हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती देवदत्तसह जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. दोघांच्या या डान्स व्हिडीओला १.८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५७ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं असून २००हून अधिक जणांनी प्रतिकिया दिल्या आहेत.
संजना व देवदत्तचा व्हिडीओ पाहून कोणी कौतुक केलं आहे, तर कोणी सल्ले दिले आहेत. “एक नंबर”, “बाळा पेपर सुरू आहे रे…तू आता अभ्यास कर”, “बाळा तुझं वय रील्स बनवायचं नाही…शाळा शिक”, “किर्लोस्कर बाईने बघितलं तर अवघड होईल”, “गणीने खूप भारी डान्स केला”, “खूप छान”, “सुंदर”, अशा नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
सध्या पारू मालिकेत काय सुरू आहे?
मालिकेतील आदित्य ज्या डोळ्यांच्या प्रेमात पडला होता, ते डोळे पारूचे असल्याचं त्याला समजलं आहे. पारूने हे सत्य लपवल्यामुळे आदित्यला ते स्वीकारणं कठीण जात आहे. त्यामुळे तो पारूवर ओरडताना पाहायला मिळाला. त्यानंतर पारू किर्लोस्करांचं घर सोडून निघून गेली. पण आता लवकरच आदित्य आणि पारूच्या प्रेमाचा प्रवास सुरू होणार आहे. स्वतः आदित्य पारूला पुन्हा घरी नेण्यासाठी येणार असल्याचा प्रोमो सध्या चर्चेत आला आहे.