‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेत नुकतीच पूर्वा शिंदेची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री पूर्वा शिंदेने दिशा ही भूमिका साकारली आहे. दिशा ही जेलमध्ये होती, पण आता तिची सुटका झाली असून तिने थेट अहिल्यादेवीच्या बंगल्यावर जाऊन किर्लोस्कर घराण्याचा सर्वनाश करण्याचं आव्हान दिलं आहे. तसंच स्वतःची नवी कंपनी दिशाने सुरू केली आहे. त्यामुळेच सध्या दिशा म्हणजे पूर्वा शिंदे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूर्वा शिंदेने ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी पूर्वाने मालिकेच्या सेटवर ‘भोंगा’ अशी तिला का हाक मारतात? याबाबत सांगितलं. पूर्वा म्हणाली, “मी सेटवर मोठ्या आवाजात बोलणारी व्यक्ती आहे. त्यामुळे मला ‘भोंगा’ म्हणतात. मी खूप मस्ती करते. प्रत्येकाच्या वाढदिवशी माझाच वाढदिवस असल्यासारखी वागत असते. मी खूप आनंदी व्यक्ती आहे. तसंच मी खूप मोठ्याने व्यक्त होणारी व्यक्ती आहे. मला आरडाओरड करायला, मस्ती करायला खूप आवडतं. मी एखादी बातमी ऐकली तर सेटवर आरडाओरड करून जोरात सांगणार. खूप दिवसांनी सेटवर आल्यावर जोरजोरात गूड मॉर्निंग म्हणणार. हळू आवाजात, शांतपणे असं माझं काहीही नसतं. मी आधीपेक्षा खूप शांत झालीये. तरीही मी ‘भोंगा’ आहेच.”

पुढे पूर्वा शिंदे विचारलं की, एवढी एनर्जी कुठून येते? तर पूर्वा म्हणाली की, मला माझे भाऊ पण एनर्जी बॉम्ब म्हणतात. ते विचारतात, नक्की काय करतेस ज्यामुळे तुझ्यात एवढी एनर्जी असते? मला माहीत नाही. पण, मी आधी खूप स्पोर्टसमध्ये असायचे, त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह मी अशी असतेच. मी माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांबरोबर खूप छान जगते. आमच्या सेटवर आम्ही खूप कुटुंबासारखे राहतो. एक आपलेपणा आपल्याला जेव्हा वाटतो तिथे आपण पाहिजे तसं वागू शकतो. तसंच मी सेटवर फिरत असते.

दरम्यान, पूर्वा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘पारू’ मालिकेआधी ‘लागिरं झालं जी’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘जीव माझा गुंतला’, ‘टोटल हुबलाक’ यांसारख्या मालिकेत झळकली होती. तसंच तिने ‘युवा डान्सिंग क्वीन’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या दोन लोकप्रिय कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame purva shinde nickname on serial set pps