पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांची अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चा होताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्ट, मुलाखतींमधील वक्तव्ये अशा अनेक कारणांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. पारू मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणारा प्रसाद जवादे( Prasad Jawade) आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अमृता देशमुख(Amruta Deshmukh) हे जोडपेदेखील सातत्याने चर्चेत असल्याचे दिसते. अमृता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सक्रिय असते. अनेकदा ती प्रसादविषयीचे प्रेम व्यक्त करणारे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता अभिनेत्री पूर्वा शिंदे(Purva Shinde)ने प्रसाद अमृतावर किती प्रेम करतो, याबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर अमृताच्या एका फॅनपेजने अमृता व प्रसाद यांचे काही व्हिडीओ व फोटो वापरून एक रील तयार केली आहे. या व्हिडीओला प्रेमाचा आशय असलेला एक ऑडिओदेखील जोडला आहे. पूर्वाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करीत व्हिडीओ क्यूट असल्याचे म्हटले आहे. पुढे तिने अमृताला टॅग करीत लिहिले, “पुरुष प्रेमात कसे असतात, त्याचे प्रसाद योग्य उदाहरण आहे. जेव्हा अमृताच्या मेसेजचे नोटिफिकेशन येते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो हे तू पाहायला पाहिजे. जेव्हा कोणी तिच्याबद्दल बोलत असते किंवा तो तिचे ब्लॉग बघत असतो, ते जेव्हा व्हिडीओ कॉलवर बोलत असतात किंवा ते मेसेजवर बोलत असतात, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. तो वेड्यासारखा तुझ्या प्रेमात आहे”, असे म्हणत पूर्वाने अमृता व प्रसादच्या नात्याचे कौतुक केले आहे. तसेच प्रसाद अमृतावर किती प्रेम करतो हे देखील सांगितले आहे. पूर्वा शिंदेने पुढे लिहिले, “तुझ्यामुळे त्या कुजक्या प्रसादचे रूपांतर क्यूट प्रसादमध्ये झाले आहे, तुमचे प्रेम फक्त वाढत जाऊ दे”, असे म्हटले आहे.

पूर्वाचा हा मेसेज शेअर करत अमृताने तिचे आभार मानले. अमृताने लिहिले, “हे लिहिण्यासाठी पूर्वा धन्यवाद. मी त्याला जास्त वेळ बघत नाही, पण हे अंतर आम्हाला अजून जवळ आणत असल्याचे वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले. हे मागच्या जन्माचे पुण्य आहे”, असे म्हणत अमृताने पूर्वाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. सध्या प्रसाद ‘पारू’ या मालिकेत आदित्यच्या भूमिकेत दिसत आहे, तर अमृता झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेत एन्ट्री करणार आहे.

Story img Loader