‘लागिरं झालं जी’ मालिकेत जयश्रीची भूमिका साकारत अभिनेत्री पूर्वा शिंदे(Purva Shinde) घराघरांत पोहोचली. अभिनेत्री सध्या पारू मालिकेत काम करताना दिसत आहे. पूर्वा शिंदेने या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली आहे. दिशा असे तिच्या पात्राचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे पूर्वा शिंदेने साकारलेले खलनायिकेचे पात्र लोकप्रिय ठरताना दिसत आहे. किर्लोस्करांना त्रास देण्यासाठी ही दिशा आता कोणत्या पातळीला जाऊ शकते, कट-कारस्थान करू शकते. पारूवर तिचा विशेष राग असल्याचे दिसते, कारण पारू तिला तिच्या योजनांमधून यशस्वी होऊ देत नाही. दिशा अनेकदा दामिनीची मदत घेत असते. दामिनीला पारू आवडत नसल्याने तीदेखील अनेकदा दिशाला मदत करते. तर कधी दिशाविरूद्धही बोलते. मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
पूर्वा शिंदेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर पारूच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री शरयू सोनावणे, दामिनीच्या भूमिकेत दिसणारी श्रृतकिर्ती रणजीत आणि प्रियाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री संजना काळे दिसत आहेत. या व्हिडीओत अभिनेत्रींनी एकमेकींना रंग लावत रंगपंचमी साजरी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्या एकमेकींना रंग लावत मजा करताना दिसत आहेत. त्यांनी काही फोटो काढल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पूर्वाने त्यावर पारूच्या टीमची रंगपंचमी, तसेच जी तुमची माणसं असतात, ती तुमच्याजवळ असतात असे लिहिले आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना शरयू व श्रृतकिर्तीला टॅगदेखील केले आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
पूर्वा शिंदे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. कधी फोटो, कधी डान्सचे व्हिडीओ शेअर करीत अभिनेत्री प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते. नुकताच तिने अभिनेता प्रसाद जवादेबरोबर एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता. तसेच इतर कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात. चाहतेही त्यांच्या या पोस्ट, फोटो व व्हिडीओला पसंती दर्शवताना दिसतात.
दरम्यान, आता पारू मालिकेत ट्विस्ट आल्याचे दिसत आहे. दिशाने पुन्हा एकदा किर्लोस्करांना धमकी दिली आहे. तिने कंपनीच्या लोगोप्रकरणी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.