एखाद्या मालिकेत जसे सकारात्मक पात्र असतात, तसेच नकारात्मक पात्रही असतात. प्रेक्षकांकडून जितका नकारात्मक पात्रांचा तिरस्कार केला जातो, तितकीच त्यांची भूमिका यशस्वी मानली जाते. एखादी कलाकृती पूर्ण होण्यासाठी हरतर्हेच्या भूमिका महत्वाच्या असतात. आता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘पारू'(Paaru) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत पारू ही गुणी, सर्वांचा मान-सन्मान करणारी, आपल्या माणसांवर प्रेम करणारी, त्यांची काळजी करणारी, त्यांच्यावर कोणते संकट येऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न करणारी, कुटुंबाआधी कोणत्याही संकटाला स्वत: सामोरे जाणारी अशी ही पारू सर्वांचे मन जिंकते. तर दुसरीकडे दिशा व अनुष्का या नकारात्मक वाटतात. सतत काही ना काही कट कारस्थान करताना दिसतात. दुसऱ्यांचे नुकसान करून त्यांना छान वाटते, समाधान मिळते. आता या मालिकेतील अभिनेत्रींनी एकमेकींच्या भूमिकेबद्दल वक्तव्य केले आहे.
शरयू सोनावणे काय म्हणाली?
पारू या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणेने पारू ही भूमिका साकारली आहे. पूर्वा शिंदेने दिशा ही भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री श्वेता खरातने अनुष्काने ही भूमिका साकारली आहे. या तीन अभिनेत्रींनी कलाकृती मीडियाबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांना कोणाची भूमिका करायला आवडेल असे विचारले. श्वेताला दिशा ही भूमिका करणार का? असे विचारल्यानंतर अभिनेत्रीने म्हटले की, ती पावरहाऊस आहे. नाही येणार मला. ती भूमिका करताना मी दमून जाईल.
शरयू सोनावणेने कोणती भूमिका करायला आवडले यावर बोलताना म्हटले, “पारूला पारू ही भूमिकाच करायला आवडेल. पुढे अभिनेत्रीने दिशा व अनुष्का या भूमिकांविषयी बोलताना म्हटले, “हे जर करायचं असतं तर मी आज पारू करत नसते. कारण- हे करणं खूप अवघड आहे. यासाठी खूप शक्ती लागते. आपल्याकडे एक हिंमत लागते की आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर कुजकेपणाने वागायचं आहे. खूप टोचून बोलायचं आहे. त्यामुळे मी या दोघंचही कौतुक करते की खरंच यांचं काम आहे ते खूप कठीण आहे. मी यांना थँक्यूसुद्धा म्हणेन. मी मागेसुद्धा एका मुलाखतीत म्हटले होते की या दोघी तितक्या शक्तीशाली आहेत, त्या इतक्या भारी वाटतात ना, त्यामुळे पारूचं पात्र उठून दिसतं”, असे म्हणत शरयूने श्वेता व पूर्वा या दोन्ही अभिनेत्रींचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पारू मालिकेबाबत बोलायचे तर अनुष्का व दिशा मिळून किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळते. दिशा परतल्याने सर्वजण काळजीत आहेत. आता पारूला अनुष्का किर्लोस्कर कुटुंबालासाठी संकट निर्माण करणार असल्याचे सत्य माहित झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होताना दिसतात. अनुष्काने तिच्या वागण्याने सर्वांच्या मनात जागा निर्माण केली. अनुष्कासारखी मुलगी आदित्यची पत्नी असावी, म्हणून अहिल्यादेवी किर्लोस्करने आदित्य व अनुष्काचे लग्न ठरवले. त्यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला आहे. आता पारू किर्लोस्कर कुटुंबासमोर दिशा व अनुष्काचे सत्य आणू शकणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.