‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शरयू सोनावणे ( Sharayu Sonawane ) सध्या ‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत शरयूने साकारलेली पारू प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळताना दिसत आहे.
नुकतंच ‘पारू’ मालिकेला वर्ष पूर्ण झालं. यानिमित्ताने १२ फेब्रुवारीला खास सेलिब्रेशन करण्यात आलं. कलाकारांनी केक कापून, ढोल-ताशांच्या गजरात सेलिब्रेशन केलं. यावेळी पारूचा ३० फुट उंच पोस्टर लॉन्च करण्यात आला. एवढंच नव्हे तर दिशाची एन्ट्रीदेखील पाहायला मिळाली. ‘पारू’ मालिकेच्या वर्षपूर्तीनिमित्तानेच शरयू सोनावणेने माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा तिने एका चाहतीचा किस्सा सांगितला.
‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना शरयू सोनावणे चाहतीचा किस्सा सांगत म्हणाली, “मला एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. मी एका कार्यक्रमाला गेले होते. यावेळी एका काकूंच्या पायात चप्पलसुद्धा नव्हती. त्या चार घरातलं घरकाम करणाऱ्या काकू होत्या. त्या मला भेटल्या आणि त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. त्या मला म्हणाल्या की, आम्ही तुमची मालिका न चुकता बघतो. त्यांच्या घरात टीव्ही पण नव्हती. त्यामुळे त्या मुलांसह दुसऱ्या कोणाकडे तरी जाऊन ‘पारू’ मालिका बघायच्या.
“तेव्हा त्यांच्याकडे १०० रुपयांची नोट होती. ती नोट त्यांनी मला काढून दिली. मी म्हटलं, मला नकोय. तर त्या म्हणाल्या, तुम्हाला १०० रुपये घ्यावे लागेल. माझ्याकडे जितके पैसे होते, तितके पैसे मी दिले आहेत. त्या घरकाम करणाऱ्या काकू हेच प्रेक्षकांचं प्रेम आहे. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही,” असं शरयू सोनावणे म्हणाली.
‘पारू’ मालिकेत सध्या काय सुरू आहे?
तुरुंगातून आता दिशाची सुटका झाली आहे. त्यामुळे दिशा किर्लोस्कर उद्योगसमूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करते; ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतो. अहिल्यादेवी चिंतेत आणि विचारात आहे की आदित्य या कठीण स्पर्धेला कसा सामोरा जाईल? तर दुसऱ्याबाजूला अनुष्का पारू आणि आदित्यच्या नात्यातली माहिती गोळा करू लागते. पारूविरुद्ध काहीतरी सबळ पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करते. पारू मात्र अनुष्काला तिच्याच पद्धतीने उत्तर देते. तिच्या निर्भीड आणि बिनधास्त स्वभावाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तिचा हा नवा अवतार तिच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरतो.