अभिनेत्री श्वेता खरात(Shweta Kharat) ही ‘पारू’ मालिकेतील तिच्या अनुष्का या पात्रामुळे मोठ्या चर्चेत आली होती. तिने साकारलेल्या अनुष्का या पात्रासाठी तिला प्रेक्षकांकडून वेळोवेळी शाबासकीची थाप मिळाल्याचेही पाहायला मिळाले. खलनायिकेच्या पात्रातूनही अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनांवर राज्यही केले. आता पारू मालिकेतील तिच्या पात्राचा शेवट झाला आहे. परंतु, आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्वेता खरातने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो ‘पारू’ मालिकेतील अनुष्काच्या पोशाखातील आहेत. हे फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले, “अनुष्का म्हणून निरोप घेत आहे. अशी खलनायिका जिचा तिरस्कार करायला तुम्हाला आवडले. गुंतागुंतीचे, भयानक, अविश्वसनीय असे पात्र साकारण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. माझ्या पात्राची वाईट बाजू स्वीकारल्याबद्दल धन्यवाद! इतके चांगले प्रेक्षक असल्याबद्दलही धन्यवाद. हा न विसरण्यासारख्या प्रवासाचा भाग होता. पण, प्रत्येक गोष्टीचा शेवट ही नवीन सुरुवात असते”, असे म्हणत अभिनेत्रीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
श्वेता खरातच्या या पोस्टवर अभिनेत्री शरयू सोनावणेने हार्ट इमोजी शेअर केली आहे. तर, अहिल्यादेवीच्या भूमिकेत दिसणाऱ्या मुग्धा कर्णिकने, तुझी आठवण येतेय, अशी कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या अभिनयाचे, ‘पारू’ मालिकेतील तिच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. “अनुष्का कायमच आमच्या हृदयात राहील”, “उत्तम काम, तू हे पात्र जगली आहेस”, “काय भारी काम केलं तुम्ही”, “पारू मालिका बघताना अनुष्का म्हणून तुमची खूप आठवण येईल”, “मला तुम्ही खलनायिका म्हणूनच आवडता”, “तुझा अभिमान आहे”, “आमचं मनोरंजन करण्यासाठी धन्यवाद आणि तुला नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा”, असे म्हणत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘पारू’ मालिकेत श्वेता खरातने दिशाची बहीण अनुष्का म्हणून एन्ट्री केली होती. दिशाचा किर्लोस्करांनी अपमान केला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी अनुष्का किर्लोस्करांच्या आयुष्यात आली होती. दिशा व अनुष्का यांनी किर्लोस्करांना संपविण्यासाठी कारस्थान केले होते. आदित्यला किडनॅप करून, त्याला सोडविण्यासाठी अहिल्यादेवीलादेखील बोलावले होते. अहिल्यादेवी तिथे गेल्यानंतर त्यांनी तिलाही बांधून ठेवले. पारू त्यांच्या मदतीला आली होती. पारूने अनुष्काचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, दिशाने त्यांच्याभोवती रॉकेल ओतत त्यावर काडी पेटवून टाकली. त्यावेळी आदित्यने दिशाच्या हातातील जळती काडी ओतलेल्या रॉकेलपासूनच दूर भिरकावण्याचा प्रयत्न केला होता; पण तो निष्फळ ठरला आणि आग लागली. त्या प्रसंगी तिथे अहिल्या-आदित्यबरोबरच पारू व अनुष्कादेखील होती. मात्र, वेळीच अहिल्या, पारू, आदित्य त्या संकटातून बाहेर पडले आणि अनुष्का तिथेच राहिली. त्या आगीतच ती मारली गेली. अशा रीतीने अनुष्काच्या पात्राचा शेवट झाल्याचे पाहायला मिळाले.
नुकतेच दिशाने किर्लोस्करांच्या घरात येत बहिणीच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचे म्हटले. त्यामुळे आता मालिकेत काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.