Zee Marathi Paaru Serial : आदित्यने मनधरणी केल्यावर अखेर ‘पारू’ किर्लोस्करांच्या घरी परतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘पारू’ आदित्यपासून दूर तिच्या गावी निघून गेली होती. पण, काही केल्या तिला घरी पुन्हा आणायचं असा निश्चय आदित्यने केलेला असतो. तो अहिल्यादेवींशी चर्चा करून पारूला किर्लोस्करांकडे पुन्हा बोलवून घेतो.

‘पारू’ घरी आल्यावर आदित्य मोठ्या प्रेमाने तिला कानातले भेट देतो. सर्व कुटुंबीयांबरोबर गुढीपाडवा साजरा केल्यावर आदित्य पारूला एक भेट म्हणून हे कानातले देतो. त्याने दिलेलं गिफ्ट ‘पारू’ सगळा रुसवा फुगवा घालवून स्वीकारते यामुळे आदित्यचा आनंद गगनात मावेनासा होतो.

आदित्यने कानातले गिफ्ट दिल्यापासून, पारूने तिचे जुने कानातले बदलून हे नवीन कानातले परिधान केल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. मात्र, इतके सुंदर, नाजूक आणि महागडे कानातले पारूने का घातलेत? ही गोष्ट दामिनीला खटकते आणि ती पारूवर चोरीचा आळ घेते. आपल्यावर चोरीचा आळ आल्यावर पारू चांगलीच संतापते. साधीभोळी पारू पहिल्यांदाच दामिनीला सडेतोड उत्तर देणार आहे.

दामिनी तिला म्हणते, “पारू हे कानातले आताच्या आता काढ, हे कानातले तू १०० टक्के चोरलेस.” यावर पारू तिला सांगते, “हे कानातले मला आदित्य सरांनी भेट म्हणून दिले आहेत.” पारूचा भाऊ सुद्धा बहिणीच्या पाठिशी उभा राहतो आणि म्हणतो, “माझ्या तायडीनं चोरी वगैरे नाही केली.” एवढ्यात दामिनी गणीला कानशिलात मारण्याचा प्रयत्न करते. हे सगळं पाहून पारूचा राग अनावर होतो.

पारू दामिनीला सडेतोड उत्तर देत सांगते, “अति होतंय आता तुमचं… एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही चोर वगैरे नाहीये. यापुढे काहीपण बोलताना १०० वेळा विचार करायचा.” यानंतर दामिनी रागाने किचनमधून निघून जाते.

दामिनी गेल्यावर, “तुझा हा अवतार पहिल्यांदाच पाहिलाय” असं सांगत सावित्री तिचं कौतुक करते. मालिकेचा हा विशेष भाग १० एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० ला प्रसारित केला जाणार आहे.