Paaru : ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत सध्या किर्लोस्कर कंपनीच्या लोगोवर असलेले डोळे नेमके कोणाचे आहेत याचा शोध आदित्यकडून सुरू आहे. याचदरम्यान, ‘पारू’ला ते डोळे दुसऱ्या-तिसऱ्या मुलीचे नसून तिचे स्वत:चे आहेत याची खात्री पटते. आता हे सत्य आदित्यसमोर केव्हा येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘पारू’ मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. खलनायिका अनुष्काचा खरा चेहरा, तिची क्रूर वृत्ती सर्वांसमोर उघड करून ‘पारू’ने पुन्हा एकदा अदिल्यादेवींचा विश्वास जिंकला आहे. पण, आताच तिची खरी लढाई सुरू झाली आहे. ‘पारू’ला काही करून आदित्यच्या मनात आपलं स्थान निर्माण करून त्याचं प्रेम जिंकायचं असतं. मात्र, पारू आणि आदित्य दोघांच्याही जीवनशैलीत कमालीचा वेगळेपणा असतो, त्यामुळे काहीही झालं तरी, किर्लोस्कर आपल्याला सून म्हणून स्वीकारणार नाहीत याची ‘पारू’ला खात्री असते.
आदित्यसमोर अचानक एक त्रयस्थ मुलगी येऊन म्हणते, “कंपनीच्या लोगोवरचे डोळे माझे आहेत” पण, तो लोगो आदित्यच्या मनावर इतका कोरलेला असतो की, तो पाहताक्षणी ही मुलगी ती नाहीये हे ओळखतो. यानंतर सगळेजण भावनांशी खेळत आहेत हा विचार करून आदित्य प्रचंड संतापतो.
एकीकडे आदित्य लोगोवर कोणत्या मुलीचे डोळे आहेत याचा शोध घेत असतो तर, दुसरीकडे पारूच्या मनात एक वेगळाच विचार सुरू असतो. “आदित्य सरांना जेव्हा कळेल की, हे डोळे माझेच आहेत… तेव्हा ते मैत्री सुद्धा तोडून टाकतील कारण, आपली लायकीच नाही. माणसाने नेहमी पायरी ओळखून राहावं. बाबा म्हणतात तसं… काजव्याने सूर्याची बरोबर करू नये” भावनिक होऊन असे नकारात्मक विचार ‘पारू’च्या मनात चालू असतात.
पण, अचानक भानावर येऊन आता ‘पारू’ एक ठाम निश्चय करणार आहे. स्वत:चं मंगळसूत्र हातात घेऊन ‘पारू’ म्हणते, “माझं हे मंगळसूत्र माझ्या आयुष्यातील सगळ्या संकटांशी लढण्याचं बळ देईल मला…” पुढे, पारू आणि दामिनीची भेट होते. दामिनी ‘पारू’च्या हातातील स्केच पाहते. आता कंपनीच्या लोगोचे डोळे पारूचे आहेत हे सत्य दामिनीला कळेल की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, आता येत्या काही दिवसांत आदित्यला सुद्धा ते डोळे पारूचेच आहे हे सत्य समजणार आहे. मालिकेत लवकरच एक नवीन सुरुवात होऊन प्रेक्षकांना आदित्य-पारूची अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळेल.