Zee Marathi Paaru : शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पारू’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच जुनी खलनायिका दिशाने एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. दिशा आणि अनुष्का या सख्ख्या बहिणी किर्लोस्करांना उद्धवस्थ करण्यासाठी मोठा प्लॅन बनवत असतात. याची पहिली सुरुवात बॉम्बस्फोट घडवण्याच्या प्लॅनपासून होते. दिशा भर कार्यक्रमात बॉम्ब ठेवते आणि ‘पारू’ला धमकी सुद्धा देते. पण, आदित्यने प्रसंगावधान दाखवल्यामुळे सर्वांचा जीव वाचतो.

दिशा आणि अनुष्काचं सत्य ‘पारू’ला माहिती असतं मात्र, अद्याप त्या दोघींबद्दल अहिल्यादेवी किंवा आदित्यला सुद्धा माहिती नसतं. अशातच अनुष्का-आदित्यचा साखरपुडा होऊन आता किर्लोस्कर येत्या काळात दोघांच्या लग्नाचा घाट घालत असतात. त्यापूर्वी काही केल्या अनुष्काला या माणसांपासून दूर करायचं असा निर्णय ‘पारू’ने घेतलेला आहे.

‘पारू’ मनोमन आदित्यला आपला नवरा मानत असते. तर, अहिल्यादेवींचा सुद्धा ती खूप आदर करत असते. त्यामुळे आता येत्या काळात अनुष्काचं खरं रुप किर्लोस्करांसमोर आणण्यासाठी ‘पारू’ महत्त्वाचे प्रयत्न करताना दिसणार आहे. अहिल्यादेवी अनुष्काला दिशापासून सावध राहण्याचा सल्ला देत असतात कारण, त्यांना काहीच माहिती नसतं. यावेळी प्रितम म्हणतो आता ‘पारू’ एकीचा बँड वाजवणार आहे. त्याचा रोख पूर्णपणे अनुष्काकडे असतो.

दुसरीकडे, ‘पारू’ आदित्यला फोन करून म्हणते, “मी तुम्हाला भेटायला येतेय सर…मी आज जे काही सांगणार आहे त्यामुळे कदाचित आपली मैत्री तुटेल.” आता ‘पारू’ आदित्यला लग्नाचं सत्य सांगणार की, अनुष्का व दिशा एकमेकींच्या बहिणी आहे हे सांगणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी भागात ‘पारू’ आदित्यला थेट मिठी मारताना दिसेल. ‘पारू’ला आदित्यच्या मिठीत पाहून दामिनी आरडाओरडा करायला सुरुवात करते. अहिल्यादेवी तिला विचारते, “तू स्वत: ‘पारू’ला आदित्यला मिठी मारताना पाहिलंस का?” यावर दामिनी म्हणते, “नाही…अनुष्काने पाहिलं.” दामिनीने अनुष्काचं नाव घेताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.

आता १ मार्च ते ७ मार्च या ७ दिवसात ‘पारू’ नवनवीन युक्त्या करून अनुष्काचा खोटो चेहरा किर्लोस्करांसमोर उघड करणार आहे. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते.

Story img Loader