‘पारू’ (Paaru) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे पाहायला मिळते. आपल्या साध्या सरळ स्वभावाने पारू किर्लोस्कर कुटुंबीयांप्रमाणेच प्रेक्षकांना आपलेसे करून घेत आहे. विनम्र, स्वत:च्या कामात चोख असलेली अन् हजरजबाबी असलेली पारू अनेकदा खोडकरपणा करीत असल्याचेदेखील पाहायला मिळते. वडिलांच्या शब्दाबाहेर न जाणारी आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांना देवी मानणारी पारू गरीब-श्रीमंत, नोकर-मालक असे सगळे भेद विसरत अहिल्यादेवीचा मोठा मुलगा आदित्यच्या प्रेमात पडते. पण, ही गोष्ट फक्त पारू व सावित्रीआत्या या दोघींनाच माहीत आहे. आता मात्र समोर आलेल्या प्रोमोमध्ये पारूवर मोठे संकट येणार असल्याचे दिसत आहे.
जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार?
‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, पारू जंगलात हरवली आहे. ती जंगलात एकटीच चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. पारू स्वत:शीच म्हणते, “देवा, या जंगलात मी लयच लांब आलीय वाटतं.” दुसरीकडे आदित्य नानूला पार्वती कुठेय, असे खडसावून विचारताना दिसत आहे. नानू म्हणतो, “मला माहीत नाही.” आदित्य नानूला म्हणतो, “तुला माहीत नाही म्हणजे? तुझ्यासोबत आली होती ना ती?” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आदित्य पारूला शोधत आहे. तर, पारू ‘धनी’, अशी जोरात हाक मारते. ती हाक आदित्यला ऐकायला येते. मग तोही पारू अशी हाक मारून प्रतिसाद देतो. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, पारू आनंदाने झाडामागून आदित्यची मजा बघत असते. ती मागे वळून पाहते तेव्हा तिच्या डोळ्यांत भीती दिसत आहे आणि तितक्यात मागून तिच्या तोंडावर कोणीतरी हात ठेवते. आदित्य पारू, अशी हाक मारताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “जंगलात हरवलेल्या पारूला आदित्य शोधणार की घडणार घातपात?”, अशी कॅप्शन दिली आहे.
पारू व आदित्य एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या मदतीने प्रत्येक संकटावर ते मात करीत असल्याचे पाहायला मिळते. आता आदित्यची पत्नी म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी एकमताने अनुष्काची निवड केली आहे. विशेषत: अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना अनुष्का खूपच पसंत पडली आहे. मात्र, अनुष्का ही तिची बहीण दिशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या आयुष्यात आली आहे. दारूच्या नशेत तिचे आदित्यवर प्रेम नसल्याचे तिने कबूल केले आहे.
हेही वाचा: Video: नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
आता पारूवर कोणते संकट कोळसणार, आदित्य तिची मदत करू शकणार का, कोणामुळे पारूवर संकट येणार, मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.