‘पारू'( Paaru) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील पात्रे त्यांच्या वेगळेपणाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसतात. सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांचा ही मालिका बघण्याचा उत्साह कायम राहतो. काही दिवसांपूर्वीच अनुष्का या पात्राची मालिकेत एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने पारूच्या आयुष्यात मात्र लवकरच मोठी उलथापालथ होणार, असे दिसत आहे. आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये पारू काळजीत दिसत आहे.
आता पारू पुढे काय करणार?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, किर्लोस्करांच्या पार्किंगमध्ये मारुती, अनुष्का व आदित्य दिसत आहेत. जिथे अनुष्का मारुतीच्या पाया पडते; जो किर्लोस्करांचा ड्रायव्हर आहे. तो हात जोडताना दिसतो. अनुष्का मारुतीला म्हणते, “काका,तुम्ही नका हात जोडू. तुम्ही वयाने मोठे आहात. तुम्ही पारूचे बाबा आहात म्हणजे माझ्या बाबांसारखे आहात. त्यानंतर जेव्हा मारुती घरी येतो त्यावेळी तो अनुष्काच्या वागण्याने प्रभावित झालेला दिसतो. तो पारूला म्हणजेच त्याच्या लेकीला म्हणतो, “तुला सांगतो पारू, म्हणजे एवढ्या मोठ्या मॅडम, त्या चक्क माझ्या पाया पडल्या. म्हणजे अहिल्यामॅडम आपल्याला कशा मान-सन्मान देतात, अगदी तसाच. एक मात्र नक्की, अनुष्का मॅडम आहेत ना त्या आदित्यबाबांबरोबर लय खूश होत्या. तिच्या वडिलांचे हे बोलणे ऐकल्यानंतर पारू काळजीत दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अनुष्काच्या येण्याने पारू आणि आदित्यच्या मैत्रीत दुरावा येईल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मारुती ही किर्लोस्करांच्या घरी काम करणारी व्यक्ती आहे. वर्षानुवर्षे तो त्यांच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या संकटाच्या काळात अहिल्यादेवी किर्लोस्करने त्याला मोठ्या मनाने मदत केलेली असते. वेळोवेळी ती त्याला मान-सन्मान देते. ती नोकर म्हणून वेगळी वागणूक देत नाही. त्यामुळे मारुतीच्या मनात अहिल्यादेवीबद्दल वेगळीच आपुलकी आणि मोठा आदर आहे. त्यांचे सर्व चांगले व्हावे, अशी भावना त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसते. त्याची मुलगी पारू हीदेखील त्यांच्या घरी काम करते. मारुतीमुळे तिच्या मनातदेखील अहिल्यादेवीविषयी आदर आहे. ती अहिल्याला देवीच मानते. तिच्या शब्दासाठी ती काहीही करू शकते.
पारू ही संस्कारी, सुंदर व गुणी असली तरी ती न शिकलेली आहे. मात्र, तरीही किर्लोस्कारांच्या अडचणींमध्ये ती त्यांना साथ देते, त्यातून मार्ग काढायला त्यांना मदत करते. ती किर्लोस्करांच्या एका प्रॉडक्टची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये आदित्य तिला मंगळसूत्र घालतो आणि ती त्याला नवरा मानायला सुरुवात करते. घरातील मोठी सून म्हणून सर्व कामे अंगावर घेऊन, ती कामे जबाबदारीने पार पाडते आहे. ही गोष्ट फक्त तिला आणि सावित्रीला माहीत आहे. आदित्य आणि तिच्यामध्ये चांगली मैत्री आहे. आता किर्लोस्करांच्या घरात आदित्यच्या लग्नाची घाई सुरू असून, अनुष्का सगळ्यांना आवडल्याचे पाहायला मिळत आहे.
आता अनुष्कामुळे पारू आणि आदित्यच्या मैत्रीत दुरावा निर्माण होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.