गावाहून वडिलांची व अहिल्यादेवीची सेवा करण्यासाठी शहरात आलेली पारू(Paaru). शांत, नम्र तितकीच हुशार व धाडसी अशी ही पारू किर्लोस्कर घरांतील सर्वांचे मन जिंकून घेते. अहिल्यादेवी किर्लोस्करला ती देवी मानते. तिच्या एका शब्दासाठी ती काहीही करायला तयार होते. तिचा कोणीही अपमान केला, तर ती सहन करू शकत नाही. पारू मालिकेत दाखविल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा किर्लोस्कर कुटुंब संकटात सापडते, तेव्हा तेव्हा ही मुलगी त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. अहिल्यादेवी किर्लोस्करचा मोठा मुलगा आदित्य व पारूची चांगली मैत्री होते. पारू जरी किर्लोस्करांच्या घरात काम करीत असली तरी ती त्यांच्या कंपनीच्या एका प्रॉडक्टची ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर आहे. याच प्रॉडक्टच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. आदित्यसाठी हे फक्त शूटिंग असले तरी पारूने ही सर्व घटनेला सत्य मानली. तेव्हापासून ती आदित्यला नवरा मानते. आता पारू मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, पारू म्हणते की, तुम्ही माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्याआधी मला आधी सावरू दे. त्यानंतर आदित्य पारूला म्हणतो, “मी तुझा कधी झालो, मला कळलंच नाही. मी तुझ्याशिवाय आता श्वासही घेऊ शकणार नाही. कधीच वाटलं नव्हतं की, इतकं प्रेम घेऊन कोणी माझ्या आयु्ष्यात येईल. मी खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू.” असे म्हणत तो त्याच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसतो. त्याचे हे बोलणे ऐकून पारूच्या डोळ्यांत पाणी आल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पारूच्या मनातील प्रेमाला मिळणार आदित्यचा होकार?”, अशी कॅप्शन दिली आहे.

हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रसाद जवादेची पत्नी अमृता देशमुखनेदेखील कमेंटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. त्याला अभिनेत्याने हसण्याची इमोजी शेअर करत रिप्लाय दिल्याचे दिसत आहे. याबरोबरच नेटकऱ्यांनी “पारू स्वप्नात असते नेहमी”, “खरं आहे की स्वप्न”, अशा प्रकारच्या कमेंट्स केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: “सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

मालिकेत दाखिवल्याप्रमाणे, आता आदित्यचे लग्न अनुष्काबरोबर ठरले आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर, श्रीकांत किर्लोस्कर व इतर कुटुंबीयांना अनुष्का ही आदित्यसाठी योग्य वाटते. आता आदित्य पारूसमोर तिच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru marathi serial aditya will confess his love to paaru prasad jawades wife amruta deshmukhs comment on the promo caught attention nsp