Zee Marathi Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच या मालिकेला १ वर्ष पूर्ण झालं. या मालिकेत शरयू सोनावणे ( पारू ) आणि प्रसाद जवादे ( आदित्य ) यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. गेल्या वर्षभरात या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, याचा टीआरपी सुद्धा चांगला आहे. सध्या या मालिकेत पारू विरुद्धा अनुष्का-दिशा असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
दिशा आणि अनुष्का या सख्ख्या बहिणी किर्लोस्करांना उद्धवस्थ करण्यासाठी मोठा प्लॅन बनवत असतात. पण, या दोघींना हुशार पारू चांगलीच अद्दल घडवणार आहे. ‘पारू’ नवनवीन युक्त्या करून अनुष्काचा खोटा चेहरा किर्लोस्करांसमोर उघड करणार आहे. यामुळे मालिकेत एक नवीन वळण येईल.
‘पारू’मुळे आता लवकरच अहिल्यादेवी किर्लोस्करांसमोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड होणार आहे. अनुष्का हीच दिशाची सख्खी मोठी बहीण असते, तिने आदित्यशी लग्न करण्याचा नेमका हेतू काय आहे? याची अहिल्यादेवी व किर्लोस्कर कुटुंबीयांना अजिबात कल्पना नसते. पण, पारूला तिचा खरा चेहरा माहिती असतो. आता पारू लवकरच आदित्यच्या जीवाचं रक्षण करून अहिल्यासमोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड करेल. परिणामी, कथानकानुसार अनुष्का हे पात्र ‘पारू’ मालिकेतून एक्झिट घेईल. याच संदर्भात अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने ‘पारू’ मालिकेच्या आगामी स्क्रिप्टचा फोटो शेअर करत त्यावर “One Last Time” असं कॅप्शन दिलं आहे. या स्क्रिप्टवर “तुझा शेवटचा दिवस अनुष्का” असं लिहिण्यात आलेलं आहे. याशिवाय खालच्या स्क्रिप्टवर नजर मारल्यास अहिल्या या पात्राच्या नावासमोर “त्या दिशा आणि त्या अनुष्काचा काही भरवसा नाही. त्यांनी आदित्यच्या केसाला जरी धक्का लावला… तरी, मी त्या दोघींना जिवंत नाही सोडणार” असा डायलॉग लिहिल्याचं पाहायला मिळत आहे.

यावरून आता अहिल्यासमोर अनुष्का आणि दिशाचं खरं रुप येऊन…लवकरच अनुष्का ही खलनायिका या मालिकेतून एक्झिट घेईल हे स्पष्ट होत आहे. दरम्यान, श्वेताने शेअर केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आता ‘पारू’ मालिकेत हा ट्विस्ट केव्हा पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.