‘पारू'(Paaru) मालिकेत दिशाच्या एन्ट्रीमुळे मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. विशेषत: दिशा पुन्हा परतल्याने प्रेक्षकांनाही आनंद झाल्याचे सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये पाहायला मिळाले. आता दिशाच्या येण्याने मालिकेत काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दिशाने पहिल्यापेक्षा आता ती जास्त ताकदीने आल्याचे म्हटले आहे. आता मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून दिशाने आल्यानंतर लगेचच किर्लोस्करांना मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे.
आज आदित्य जर इथे आला तर…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की दिशा किर्लोस्करांच्या समोर आली आहे. ती अहिल्यादेवीला म्हणते, “आज आदित्य जर इथे आला तर तो तुझा आणि नाही आला तर तो देवाचा”, दिशाचे हे बोलणे ऐकल्यानंतर किर्लोस्कर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे. अहिल्यादेवी म्हणते, मोहन आदित्यला फोन लाव. त्यावर दिशा तिला चिडवण्यासाठी नाटक करीत म्हणते, हॅलो अहिल्या मॅडम, मला एक डेडबॉडी सापडली आहे, तर ओळख पटवण्यासाठी पोलिस ठाण्यात याल का?
हा प्रोमो शेअर करताना, “दिशाचं अहिल्यादेवींना खुलं आव्हान…”, अशी कॅप्शन दिली आहे.
पारू मालिकेत सतत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. प्रीतम व दिशाचे लग्न ठरले होते, मात्र दिशा प्रीतमबरोबर फक्त प्रॉपर्टीसाठी लग्न करत होती. त्यासाठी तिने अनेक कारस्थाने केल्याचे पाहायला मिळाले. पारू व आदित्यने अनेक प्रयत्न करीत तिचे सत्य सर्वांसमोर आणले व तिचे प्रीतमबरोबरचे लग्न थांबवले. दिशाचे सत्य समजताच अहिल्यादेवीने तिला तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी पाठविले. त्यानंतर प्रिया व प्रीतमचे लग्न झाले. दिशाला किर्लोस्करांकडून जी वागणूक मिळाली त्याचा बदला घेण्यासाठी दिशाची बहीण अनुष्का किर्लोस्करांच्या आयुष्यात आली. तिने तिच्या स्वभावाने सर्वांचे मन जिंकले. अहिल्यादेवीला ती आदित्यसाठी योग्य वाटली. त्यानंतर तिने आदित्य व अनुष्काचे लग्न ठरवले.
आता दिशा परतल्याने दोघी बहिणी मिळून किर्लोस्करांविरुद्ध काय कट रचणार आणि पारू या सगळ्यातून त्यांना कसे बाहेर काढणार हे पाहणे महत्वात्त्वाचे ठरणार आहे.