‘पारू'(Paaru) मालिका सध्या नवीन वळण घेताना दिसत आहे. मालिकेत सतत काही ना काही रंजक गोष्टी घडत असल्यामुळे प्रेक्षक ही मालिका उत्सुकतेने पाहत असतात. पारू ही अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. आदित्य, प्रितम, अहिल्यादेवी किर्लोस्कर, श्रीकांत किर्लोस्कर, सावित्री आत्या, मारूती, त्याची मुलगी पारू, दामिनी आणि मालिकेतील इतर सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी मालिकेत अनुष्काची एन्ट्री झाली असून तिच्यामुळे किर्लोस्कर कुटुंबावर मोठे संकट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. आता समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये अनुष्का पारूला सत्य सांगत असल्याचे दिसत आहे.
दारूच्या नशेत अनुष्का पारूला सत्य सांगणार; मालिकेत पुढे काय होणार?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पारू व अनुष्का दोघींनी दारू प्यायली असून दोघीही नशेत असल्याचे पाहायला मिळत आहे. पारू अनुष्काला विचारते, “आदित्य सरांवर प्रेम आहे ना?” पारूच्या या प्रश्नाचे उत्तर देताना अनुष्का हातातील ग्लास जमिनीवर फेकत त्वेषाने म्हणते, “अरे हट” यावर पारू तिला दारूच्या नशेतच विचारते की प्रेम नाही करत तर आदित्य सरांबरोबर लग्न का करताय? त्यावर अनुष्का पारूला सांगते, “बदला घ्यायचाय. मी सगळ्यांना बरबाद करणार आहे”, त्यावर पारूला आणखी प्रश्न पडल्याचे तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर, “अनुष्का नशेत पारूला सगळं सत्य सांगणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, पारू ही किर्लोस्करांच्या घरातील नोकर असली तरी ती त्यांच्यासाठी काहीही करू शकते. या घरातील माणसांसाठी ती कोणतीही गोष्ट करायला तयार होते. दिशा किर्लोस्कर कुटुंबाला फसवत आहे, हे समजल्यानंतर तिने प्रितम व दिशाचे लग्न मोडल्याचे पाहायला मिळाले होते. दिशाचे सत्य समोर आल्यानंतर तिला तुरूंगात पाठविल्याचे पाहायला मिळाले. आता दिशाची बहिण अनुष्का त्याचा बदला घेण्यासाठी आदित्यचा आयुष्यात आल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.