‘पारू’ या मालिकेतील पारू आणि आदित्य या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली आहे. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे आणि वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. आता पारू आणि आदित्यच्या भावना सांगणारे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘गाठ ही आपली नियतीनं घातली…’
‘झी मराठी वाहिनी’ने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर पारू आणि आदित्यच्या भावना सुरांतून मांडणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. ‘गाठ ही आपली नियतीनं घातली…’ अशी गाण्याची सुरुवात असून या गाण्यात आदित्य आणि पारू एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे. पारू आणि आदित्यचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. पारूने या गाण्यात साडी नेसली असून गावाकडचा संपूर्ण परिसर आणि तसाच लूक या गाण्यात पाहायला मिळत आहे. बैलगाडी, मेंढ्या, निसर्ग यामुळे त्यांची शेतकऱ्याची जोडी असल्याचे गाण्यात दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, पारू घराबाहेर चुलीवर भाकरी करत असून तिच्या हाताला चटका बसतो, त्यावर आदित्य फुंकर घालत आहे. पारू आणि आदित्यमधील प्रेम खुलत असल्याचे या गाण्यात दिसत आहे.
हे गाणे शेअर करताना, “गाणं मन जोडणारं, गाणं प्रेम खुलवणारं, गाणं मनातलं ओठावर आणणारं”, असे झी मराठीने म्हटले आहे.
मालिकेत नुकतेच प्रिया आणि प्रीतमचे लग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य आणि पारू यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे लग्न होणे शक्य झाले. सुरुवातीला प्रीतमच्या आईने त्याचे लग्न दिशाबरोबर ठरवलेले असते. मात्र, दिशा प्रीतमबरोबर फक्त त्यांच्या प्रॉपर्टीसाठी लग्न करणार असते. यादरम्यान प्रीतमच्या आयुष्यात प्रिया येते आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रियाच्या वडिलांचे मन जिंकण्यासाठी पारू, आदित्य आणि प्रीतम तिच्या घरी नोकर म्हणून राहतात. त्यावेळी पारू आणि आदित्य नवरा-बायको असल्याचे नाटक करतात. मात्र, प्रीतम आणि आदित्य हे अहिल्यादेवी किर्लोस्करची मुलं असल्याचे समजल्यावर प्रियाचे वडील या लग्नाला नकार देतात.
अहिल्यादेवी किर्लोस्कर ही त्यांची बहीण असते आणि काही गैरसमजामुळे ते एकमेकांशी बोलत नसतात. पारू त्यांच्यातील गैरसमज दूर करते. दिशाचा प्रीतमबरोबर लग्न करण्याचा हेतू जेव्हा सर्वांसमोर येतो, त्यावेळी प्रीतम आणि प्रियाचे लग्न लावून दिले जाते.
हेही वाचा: रोहिणी हट्टंगडी यांचा ‘हा’ चित्रपट पाहण्यास त्यांच्या मैत्रिणींनी दिलेला नकार; कारण सांगत म्हणाल्या…
दुसरीकडे, पारू ही आदित्यच्या घरात नोकर म्हणून काम करते. मात्र, ती त्यांच्या बिझनेसची ब्रॅण्ड ॲम्बेसेडरदेखील आहे. त्यांच्या प्रॉडक्टच्या एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये पारूचे लग्न होत असल्याचा सीन होता. मात्र, वेळेवर तिचा होणारा नवरा न आल्याने आदित्य त्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये तिच्या नवऱ्याची भूमिका करतो; त्यावेळी तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. पारू ते सर्व सत्य समजून आदित्यला तिचा नवरा मानते. किर्लोस्कर घरातील सर्व कामे ती मोठी सून म्हणून जबाबदारीने करते. तिचे वडील तिला आपली पायरी ओळखून राहा, असे बजावतात.
दरम्यान, आदित्य पारूला चांगली मैत्रीण समजतो. आता आदित्यदेखील पारूच्या प्रेमात पडणार का? आदित्यची आई अहिल्यादेवी त्यांचे लग्न होऊ देणार का, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.