‘पारू'(Paaru) या मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. दिशा किर्लोस्करांच्या आयुष्यात परतल्यापासून दररोज काहीतरी नवीन घडताना दिसत आहे. दिशा व अनुष्का मिळून किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी कट-कारस्थाने करत आहेत. दिशा व अनुष्काचे सत्य पारूला समजले आहे. त्यामुळे त्यांचे सत्य बाहेर येऊ नये यासाठी त्या पारूला त्रास देताना दिसत आहेत. अनुष्काने अहिल्यादेवीला पारू आदित्यला फसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच गोड बोलून पारू आदित्यचा फायदा घेत असल्याचे सांगितले. याबरोबरच पारूने हे सर्व सत्य कोणाला सांगू नये म्हणून त्यांनी हरीशच्या मदतीने पारूच्या भावाला गणीला किडनॅप केल्याचे पाहायला मिळाले. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये पारूवर संकट कोसळणार असल्याची शक्यता दिसत आहे.

या गेममध्ये जो जिंकणार…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पारू एका पत्र्याच्या खोलीत मुलांना शोधण्यासाठी म्हणून गेली आहे; पण तिला बंद केले गेल्याचे दिसते. तिच्या हाताला दुखापत झाल्याचेही पाहायला मिळते. पारू तिच्याजवळ असलेला फोन तपासते, तो फोन रेंजअभावी बंद येत असतो. पारू खोलीच्या दरवाजावर थाप मारून दरवाजा उघडण्यासाठी हाका मारते. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, दिशाने हरीश व साईलादेखील एका खोलीत बंद केले आहे. ती त्यांना म्हणते, “तुमच्यातला जगणार एक आणि मरणार एक. या गेममध्ये जो जिंकणार, तो खरं तर हरणार आणि जो हरणार तो मरणार. हरीश दिशाला दरवाजा उघडण्यासाठी विनवणी करतो. त्यानंतर खोलीत एक विषारी वायू पसरल्याचे दिसते. त्यामुळे हरीश व साईला त्रास होतो.

याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, पारू तिची सुटका करून घेते. त्यानंतर तिच्याबरोबर आदित्यदेखील दिसत आहे. त्यानंतर पारू, हरीश, साई, गणीला शोधण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हरीशला जास्त प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना, ‘पारू आणि दिशाच्या लढाईत कमी होईल का पारूचा एकेक साथीदार…?’, अशी कॅप्शन दिली गेली आहे.

पारू मालिकेत दाखविल्याप्रमाणे पारू व हरीशचे लग्न ठरले होते; पण ऐन लग्नाच्या वेळी पारूने हरीशला तिच्या मनातील आदित्यविषयीच्या भावना सांगितल्या. त्यामुळे हरीश निघून गेला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी हरीश पुन्हा परतला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. त्याचे वागणे पारूला काहीसे वेगळे वाटले. त्यानंतर हरीशने पारूच्या भावाला किडनॅप केले. दिशा व अनुष्काने जे जे काही सांगितले, ते ते त्याने केले. मात्र, हे करण्यामागे त्याचा नाईलाज होता. पारूला त्याने सांगितले की, जेव्हा पारूने त्याला आदित्यविषयी सांगितले. त्यानंतर तो तिथून निघून गेला आणि त्याने एका एनजीओमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिथे त्याला साई नावाचा एक मुलगा भेटला. त्या लहान मुलावर हरीशची खूप माया जडली होती. त्याचाच गैरफायदा घेत दिशाने साईला किडनॅप केले आणि हरीशला हे सर्व करण्यास भाग पाडले. हरीशचे हे सत्य ऐकल्यानंतर त्या दोघांनी गणी व साईला वाचविण्यासाठी प्लॅन करण्याचे ठरवले. मात्र, गणीला वाचविण्यासाठी गेल्यानंतर तिलाच अनुष्काच्या माणसाने बंद करून ठेवल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, दिशाला प्रीतमबरोबर लग्न करून किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची मालकीण व्हायचे होते. मात्र, ती फक्त पैशांसाठी लग्न करीत असल्याचे समोर आले. तिने केलेल्या गुन्ह्यांसाठी तिला शिक्षा देण्यात आली. त्यानंतर दिशाची बहीण अनुष्का बहिणीला झालेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी किर्लोस्करांच्या आयुष्यात आली. त्यानंतर दिशासुद्धा त्यांच्या आयुष्यात परतली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader