Paaru Zee Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरची ‘पारू’ मालिका एक मनोरंजक वळण घेणार आहे. मालिकेचे येणारे काही भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवणार आहेत. गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे. आदित्यला कंपनीच्या लोगोवरील डोळ्यांचं सत्य लवकरच समजणार आहे. ‘पारू’ चालत जात आदित्य तिच्या पायातले पैंजण अचूक ओळखतो आणि लोगोवरचे डोळे दुसऱ्या-तिसऱ्या मुलीचे नसून ती पारूच आहे अशी खात्री आदित्यला पटते.

डोळ्यांचं सत्य समोर येताच आदित्य घाईघाईने पारूकडे पोहोचतो, पण त्याआधीच पारू निघून गेलेली असते. समोर आलेल्या लोगोच्या सत्यामुळे पारू आपल्यापासून दुरावली अशी भावना आदित्यच्या मनात निर्माण होणार आहे. सुरुवातीला या सगळ्या गोष्टींवर त्याचा विश्वासच बसत नाही. पारूमुळे आदित्यच्या आयुष्यावर परिणाम होतोय हे माहिती पडल्यावर मारुती आपल्या लेकीला म्हणजेच पारूला आदित्यपासून दूर राहण्यास सांगणार आहे.

एकीकडे, पारूला मारुतीने आदित्यविषयीची बंधनं घातलेली असतात तर, दुसरीकडे आदित्य आता पारूच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे. मारुतीचं बोलणं स्वीकारणं आदित्यला अशक्य होतंय. त्याला पारूला काहीही करून किर्लोस्करांच्या घरी परत आणायचं असतं. आता निश्चय करून आदित्य अहिल्यादेवीची याबद्दल समजूत काढणार आहे. आदित्य त्याची आई अहिल्यादेवीला पारूला घरी आणण्यासाठी तयार करतो. पण, तो स्वतः एक निर्णय घेतो की, तो पारूला आपल्या प्रेमाची कबुली देणार नाही. तो तिचा आदर करेल, तिच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही.

आता, पारू आणि आदित्य या दोघांनाही माहीत आहे की, ते एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यांना त्यांच्या मर्यादाही ठाऊक आहेत. त्यांनी आपल्या भावनांना रोखून धरायचं ठरवलेलं आहे. त्यांच्या नात्यात काहीच न बोलता एकमेकांना समजून घेण्याची गोड कसरत निर्माण झाली आहे. जेव्हा दोन प्रेम करणारी माणसं एकमेकांना पाहण्यास आतुर असतात, पण प्रेम व्यक्त करायला धजावत नाहीत. असंच काहीसं पारू-आदित्यचं झालेलं आहे.

दरम्यान, आता ‘पारू’ किर्लोस्करांकडे परतणार का? पारू आदित्यचं प्रेम कोणत्या वळणावर जाणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल. ही मालिका ‘झी मराठी’वर संध्याकाळी ७:३० वाजता पाहायला मिळते.